वाघाच्या डरकाळीने उडाली गोंदियाकरांची झोप

12 Oct 2025 13:34:24
गोंदिया,
Gondia, tiger पक्षी, वन्यप्राणी, निसर्ग संपन्न जंगल आणि वाघ यासाठी जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा प्रसिद्ध असून जिल्ह्याच्या चौफेर वाघाचे अधिवास आहे. याची प्रचिती शनिवारी १२ ऑक्टोबर रोजी रात्री गोंदियाकरांना आली. चक्क ११.३० वाजताच्या सुमारास थेट जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाघाने एंट्री केली. आणि वाघाच्या डरकाळीने गोंदियाकरांची झोप उडाली. पहाटे ४.३० वाजता या वाघाला रेस्क्यू करून नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रात त्याची रवानगी करण्यात आली.
 

Tiger attack in Gondia, tiger caught in the Collectorate area 
 
 
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघ कमी होत असताना वाघ येथे स्थिरावत नसल्याने वन्यजीव प्रेमी देखील चिंतेत होते. दरम्यान, वाघांची संख्या वाढावी, या हेतूने वन विभाग जीव ओतून काम करीत आहे. त्यात विभागाला यश ही मिळत आहे. आता एनएनटीआरसह जिल्ह्यातील जंगलात वाघांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या चौफेर वाघाचे अस्तित्व आहे. त्यातच आता संरक्षित क्षेत्राबाहेरही वाघाचे अस्तित्व असल्याचे काही घटनांवरून पुढे आले आहे. त्यात शनिवारची रात्र गोंदियातील नागरिकांसाठी जागवणारी ठरली. वाघाने चक्क शहरात प्रवेश केला आणि एकच पळापळ झाली. शहरातील सारस चौकात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय असून याच परिसरात जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यासह जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे निवासस्थान आहेत. दरम्यान, रात्री ११.३० वाजताच्या सुमारास याठिकाणी वाघ दिसला आणि एकच पळापळ झाली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली यावर वन विभागाच्या आरआरटी पथकाने घटनास्थळ गाठून बचावकार्याला सुरुवात केली.
 
 
तोपर्यंत जवळजवळ दीड ते दोन हजार लोक याठिकाणी जमले होते. त्यामुळे पोलिस पथकाला पाचारण करण्यात आले. पहिल्यांदाच वाघ शहरात निवासी भागात आल्याने बघ्यांची गर्दी वाढतच होती. त्यात रात्रीचा अंधार त्यामुळे वाघाला रेस्क्यू करण्यात अडचणी येत होत्या. नाईट व्हिजन थर्मल ड्रोन ने वाघाचा ठावठिकाणा शोधला आणि जेसीबी ने वाघापर्यंत पोहचण्यासाठी रस्ता तयार केला. याठिकाणी निवासी घरे, कार्यालये असल्याने पथकाला हे रेस्क्यू ऑपरेशन्स राबवताना चांगलीच दमछाक झाली. मात्र, पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास या वाघाला बेशुद्ध करण्यात यश आले. वाघाला नागपूर येथील गोरेवाडा बचाव केंद्रात स्थानांतरीत करण्यात आले.
 
 
 
यांनी केले रेस्क्यू...
 
 
वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न केले. यावेळी उपवनसंरक्षक पवन जोंग, सहाय्यक वनसंरक्षक सचिन डोंगरवार, विजय धांडे, वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांच्या मार्गदर्शनात अमोल चौबे, अमित राऊत, सतीश शेंदरे, विक्रांत ब्राह्मणकरशुभम मेश्राम, राजेश ढोक, पृथ्वी सय्याम, वाहनचालक टिकेश्र्वर डोंगरवार,दिनेश सोनवाने यांनी बचावकार्य करून वाघाला जेरबंद केले. यावेळी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंगनजुडे यांच्या पथकाने नागरिकांच्या गर्दीला आवरण्याचे प्रयत्न केले.
 
शहरात वाघ आल्याचे कळताच
 
 
वाघ बघण्यासाठी जवळपास दिड ते दोन हजार नागरिकांनी एकच गर्दी केल्याने छोटीशीही चुक कुणाच्याही जीवावर बेतू शकत होते. अशावेळी पथकाने शर्तीचे प्रयत्न करून वाघाला पकडण्यात यश मिळवले. दरम्यान, सदर वाघाची गोरेवाडा बचत केंद्रात रवानगी करण्यात आली.

- दिलीप कौशिक, वन परिक्षेत्राधिकारी, गोंदिया
Powered By Sangraha 9.0