वर्धा,
vegetable prices hike अतिवृष्टी, लांबलेला पाऊस आणि वातावरणातील बदलाचा परिणाम थेट भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. ऑटोबरच्या पहिल्या आठवड्यात भाजीची आवक कमी झाल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. फुलकोबीने १०० रुपये तर मेथी २०० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. परिणामी, सर्व सामान्य नागरिकांना महागाईची झळ सहन करावी लागत आहे.
दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना भाज्यांचे दर कडाडले आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात भाज्यांचे भाव स्थिर होते. परंतु, या दोन महिन्यांत झालेल्या संततधार पावसाचा फटका भाजीपाला उत्पादनावर झाला आहे. ऑटोबर महिन्यात बाजारपेठेत भाजीची आवक निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. जिल्ह्यातील भेंडी, चवळी, वांगीची आवक बंद झाली आहे. तर सद्यःस्थितीत मध्यप्रदेश आणि इतर जिल्ह्यातून भाज्यांची आवक स्थानिक बाजारपेठेत होत आहे. महिनाभर तरी नागरिकांना चढ्या भावानेच भाजी खरेदी करावी लागणार आहे.
स्थानिक बाजारपेठेत आज रविवारी मेथी प्रतिकिलो २०० रुपये किलो, फुलकोबी १०० रुपये, कोथिंबीर २०० आणि शेवगा शेंगाने तर चांगलाच भाव खाल्ला. शेवग्याच्या शेंगा प्रतिकिलो २४० रुपये किलो होत्या. पुढे दिवाळी असून गृहिणींचा भाजीपाला खरेदीवर सुद्धा मोठा खर्च होणार आहे. सोयाबीन काढल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी, पालक, मेथी, कोथिंबीर, शेपू, मुळा, फुलकोबी आदींची लागवड करतात. सततच्या पावसामुळे सोयाबीन काढणी लांबल्याने त्याचाही परिणाम झाला आहे.
क्र. भाजीपाला दर (₹/किलो)
क्र. | भाजीपाला | दर (₹/किलो) |
---|
1 | पालक | 200 |
2 | मेथी | 200 |
3 | कोथिंबीर | 200 |
4 | शेवगा | 240 |
5 | फुलकोबी | 100 |
6 | टमाटर | 40 |
7 | वांगे | 80 |
8 | चवळी शेंगा | 100 |
9 | दोडके | 100 |
10 | ढेमस | 100 |
11 | भेंडी | 60 |
12 | करेला | 60 |
13 | मिरची | 80 |