तभा वृत्तसेवा
पाटणबोरी,
akhil hindu samaj unity, आजच्या धगधगत्या युगात अनिश्चिततेचे वातावरण असून अखिल हिंदू समाज संघटित होणे ही काळाची गरज आहे. 1925 साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. या शुभमुहुर्तावर श्रीराम प्रभूंनी रावणाचा वध केला. देवीदेवतांनी असुरांचा वध केला. पांडवांनी शमी वृक्षात लपवलेली वस्त्रे काढली. विजयादशमी उत्सव म्हणजे हिंदू संस्कृतीच्या पराक्रमाचा इतिहास आहे, असे प्रतिपादन प्रा. विजय कैथे यांनी केले.
संघावरसुद्धा 1948 ,1975, 1992 साली बंदी आली. त्यानंतरही अनेक संकटांवर मात करण्यात आली. हिंदू समाजाची संख्या ही आज कमी होत असून अल्पसंख्याक देशात वाढत आहेत. जर हिंदू समाज अल्पसंख्याक झाला तर त्याचे ज्वलंत उदाहरण आज आपण देशात पाहतच आहोत. जातीपातीचे भेदभाव दूर करून हिंदू समाजाला एकत्र जोडणे, संघटित करणे ही काळाची गरज आहे. देशात कुठेही आपत्ती असो, प्रत्येक ठिकाणी संघ स्वयंसेवक नेहमी तत्पर असतात, असेही रेशीमबाग नगर संघचालक विजय कैथे म्हणाले.
प्रमुख अतिथी म्हणून युवराज गायकवाड यांनीसुद्धा संघकार्य, संघसंस्कार यावर विचार व्यक्त करताना जातपात विसरून समाजात देशात संघटनाची गरज आहे. इतर अनेक देशांत आजसुद्धा स्त्रियांना स्वतंत्र हक्क व अधिकार नाहीत. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे आपल्या देशात स्त्री स्वातंत्र्याला समान अधिकार आहेत, असे सांगितले. तत्पूर्वी सांघिक गीत, प्रात्यक्षिक, योगासने झाली. मंचावर जिल्हा संघचालक गोविंद हातगावकर आणि खंड संचालक सागर उपस्थित होते. स्वयंसेवकाचे घोषासह नगर पथसंचलन आकर्षक होते.