बॉबी देओलचा 'व्हाइट नॉइस' लुक सोशल मीडियावर धुमाकूळ

13 Oct 2025 12:38:59
मुंबई,
Bobby Deol, 'अ‍ॅनिमल' चित्रपटानंतर अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर राहिल्यानंतर बॉबीने केवळ पुनरागमनच केलं नाही, तर सध्या तो बॉलिवूडपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत सगळीकडे मागणीचा अभिनेता ठरत आहे. मोठमोठ्या चित्रपटांचे तो सध्या महत्त्वाचे भाग बनले आहेत आणि आगामी काळातही त्याचं वर्चस्व दिसून येणार आहे.
 

Bobby Deol 
अलीकडेच आर्यन खानच्या 'बैड्स ऑफ बॉलीवूड' या सिरीजमध्ये अजय तलवार या प्रभावी भूमिकेमुळे बॉबीने पुन्हा एकदा आपल्या अभिनय कौशल्याची छाप पाडली. त्याच दरम्यान आता त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टचा एक पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.या पोस्टरमध्ये बॉबी एका अतिशय वेगळ्या आणि धडकी भरवणाऱ्या लूकमध्ये दिसत आहे. लांब केस, डोळ्यांवर गॉगल्स आणि पार्श्वभूमीत युद्धसज्ज टँक व हेलिकॉप्टर... या दृश्यांनी चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण केलं आहे. विशेष म्हणजे बॉबी या नव्या प्रोजेक्टमध्ये 'प्रोफेसर व्हाइट नॉइस' ही भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. या पोस्टसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये तो म्हणतो, “पॉपकॉर्न-पॉपकॉर्न घेऊन या, शो सुरू होणार आहे.” तसेच १९ ऑक्टोबर ही तारीखही नमूद केली आहे, जेव्हा या प्रोजेक्टवरून पूर्णतः पडदा उचलला जाणार आहे.
 
 
तथापि, हे प्रोजेक्ट नेमकं काय आहे—एक जाहिरात, वेबसीरीज की एखादा चित्रपट—याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. बॉबी देओलने या पोस्टमध्ये 'आग लगादे' असा हॅशटॅग वापरल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रश्नांची रांग लावली आहे आणि अजून काही हिंट्स मिळाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या पोस्टवर अभिनेता राहुल देव, विंदू दारा सिंग यांसारख्या सहकलाकारांनीही प्रतिक्रिया दिली असून बॉबीच्या या नव्या भूमिकेबाबत उत्सुकता वाढवली आहे. विशेष म्हणजे, या लूकमधील काही सेट फोटो आधीच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, त्यामुळे हा प्रोजेक्ट काही काळापासून तयार करण्यात येत होता, हे स्पष्ट होतं.दरम्यान, बॉबी देओल लवकरच ‘अल्फा’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘वॉर 2’मध्ये केलेल्या कॅमियोनंतर या भूमिकेचं पूर्ण विस्तार ‘अल्फा’मध्ये पाहायला मिळेल. आलिया भट्ट, शरवरी वाघ आणि अनिल कपूरसोबत तो या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट क्रिसमसच्या वेळेस प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
 
 
याशिवाय, बॉबी देओल रणवीर सिंगसोबतही एका गुप्त चित्रपटासाठी शूटिंग पूर्ण केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. या चित्रपटात दक्षिणेकडील अभिनेत्री श्रीलीला देखील असणार आहे. अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र लवकरच त्याचाही भव्य उद्घोष होण्याची शक्यता आहे.
एकंदरीत, बॉबी देओलने केवळ पुनरागमन केलं नसून सध्याच्या काळात तो सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता ठरत आहे. 'प्रोफेसर व्हाइट नॉइस'च्या रूपात तो काय नवा स्फोट घडवतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0