हिंगणघाट,
Rashtriya Swayamsevak Sangh आजपासून १०० वर्षांपूर्वी डॉ. हेडगेवार यांनी हिंदूंची अवस्था पाहून केवळ १७ स्वयंसेवकांना घेऊन संघाची स्थापना केली. अतिशय विपरीत परिस्थितीतून संघ यशस्वी झाला. याचे कारण संघाजवळ शिस्त, विचार आणि ऑयडीयालॉजी होती. म्हणून अनेक आघात पचवूनही संघ नित्यनूतन आहे असे प्रतिपादन रा. स्व. संघांचे विदर्भ प्रांत प्रमुख शैलेश पोतदार यांनी केले.
ते रविवार १२ रोजी कृउबा समितीच्या कापूस यार्डच्या मैदानावर आयोजित हिंगणघाट नगरच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वत म्हणून बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून येथील नामवंत चित्रकार हरिहर पेंदे होते. व्यासपिठावर जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक विनोद नांदुरकर उपस्थित होते.
पोतदार पुढे म्हणाले की, हिंदू समाजाला हजारो वर्षाच्या संघर्षाचा इतिहास आहे. जाती, भाषा, प्रांत यात हिंदू समाज विखूरलेला आहे. हा रोग समूळ नष्ट करण्यासाठी संघाने व्यक्तीनिर्माणाचे कार्य हाती घेतले. संघाच्या प्रयत्नातून आज अभेद्य हिंदू शक्ती उदयाला आलेली आहे. विदेशी शतीच्या बळावर स्थापन झालेली कॅम्युनीस्ट पार्टी प्रचंड धनदौलत असून कालबाह्य झाली. मात्र प्रचंड संघर्ष करून संघ आज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात कार्यरत आहे. सामाजिक समरसता, पर्यावरणाचे रक्षण स्व भाव जागरण व स्वदेशीचे आचरण करताना भाषा, भूषा, भोजन, भजन, व भ्रमण याचे भान ठेवले पाहिजे. कुटुंब व्यवस्था अबाधित ठेवली पाहिजे, या नागरी कर्तव्याचे पालन केले तर जगाच्या समोर सुसंस्कृत हिंदू राष्ट्राचे मॉडेल उभे करून भविष्यात एक भारत निर्माण करून पुन्हा एकदा भारतमाता ही विश्व सिंहासनावर आपण बसवू व विवेकानंदाचे स्वप्न साकार झालेले आपण पाहू असे प्रतिपादन त्यांनी केले.
चित्रकार हरिहर पेंदे यांनी संघ स्वयंसेवक होणे एक वैभव आहे. जो हिंदू सुसंस्कृत आहे तो प्रत्येक हिंदू स्वयंसेवकच आहे. मातृभूमीचा गौरव वाढविणार्या या संघटनेला आपण प्रणाम करतो अशी भावना व्यत केली.
नगरसंघचालक विनोद नांदुरकर यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. सायंकाळी ४.३० वाजता कॉटन मार्केट येथून शहरातील विविध मार्गाने घोष पथकासह स्वयंसेवकांनी पंथ संचालन केले. कार्यक्रमाला आ. समीर कुणावार, माजी नप अध्यक्ष राजेंद्र डागा, प्रेम बसंतानी, उद्योजक राजू राठी, विद्या विकासच्या उपप्राचार्य नयना तूळसकर, माजी नगरसेवक छाया सातपुते, अनिता माळवे, व शहरातील महिलां व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन पिढ्याचा संगम
विजयादशमी उत्सवात तीन पिढ्याचा अनोखा संगम बघावयास मिळाला. ज्येष्ठ संघ स्वयंसेवक रमेश धारकर, त्यांचे दोन चिरंजिव, पुतणे व नातू हे तीन पिढ्यांतील स्वयंसेवक विजयादशमीच्या कार्यक्रमात संपूर्ण गणवेषात सहभागी झाले होते.