रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

13 Oct 2025 19:51:20
नागभीड,
tiger death railway accident सिंदेवाही-आलेवाही-नागभीड रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा वन्यजीव मृत्यूची घटना घडली आहे. सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील टी-40 परिसरात रविवारी, 12 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजताच्या सुमारास एका पट्टेदार नर वाघाचा मृतदेह आढळला. हा वाघ ‘बिट्टू’ नावाने ओळखला जात होता.
 

tiger death railway accident  
हा वाघ अंदाजे 13-14 वर्षांचा होता. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या वाघांपैकी एक मानला जाणारा हा बिट्टू वाघ होता, असे समाज माध्यमांवर चर्चा होती. हा वाघ रेल्वेच्या धडकेत ठार झाल्याचे वनविभागाच्या प्राथमिक अहवालात म्हटले आहे. गोंदिया ते चंद्रपूर दरम्यान धावणार्‍या पॅसेंजर रेल्वेने आलेवाही ते सिंदेवाही दरम्यान या वाघाला धडक दिली. हा रेल्वे मार्ग जंगलातून जात असल्याने या भागात वाघ, बिबटे, हरणे आदी प्राणी नियमित भ्रमण करतात. मात्र, वेगवान रेल्वेमुळे अशा घटना वारंवार घडत आहेत.
घटनेची माहिती मिळताच, ब्रम्हपुरी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी वाघाचा पंचनामा करून मृतदेह टीसीसी चंद्रपूर येथे शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. पंचनाम्याच्या कार्यवाहीत उपवनसंरक्षक डॉ. कुमारस्वामी, सहाय्यक वनसंरक्षक डॉ. महेश गायकवाड, वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार, क्षेत्र सहाय्यक नितीन गडपायले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यावेळी एनजीओ प्रतिनिधी यश कायरकर,वन्यजीव रक्षक बंडू धोत्रे, एनटीसीए प्रतिनिधी मुकेश भांदककर आणि वनरक्षक आर. व्हि. धनविजय उपस्थित होते.
 
 
सामाजिक माध्यमावर बिट्टू वाघाच्या मृत्यूची बातमी व्हायरल झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये तीव्र संताप पसरला आहे. नागरीक आणि पर्यावरणसंरक्षक यांनी रेल्वे प्रशासनाकडे गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवण्याची व जंगलातून जाणार्‍या मार्गांवर विशेष सूचना फलक लावण्याची मागणी केली आहे.
Powered By Sangraha 9.0