वॉशिंग्टन,
Trump and the Indo-Pak war अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा असा दावा केला आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. गाझा शांतता चर्चेसाठी इजिप्तकडे रवाना होताना एअर फोर्स वन विमानात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला. ट्रम्प म्हणाले की, त्यांनी आतापर्यंत सात युद्धे थांबवली आहेत, ज्यात भारत-पाकिस्तान संघर्षाचाही समावेश आहे.

ट्रम्प म्हणाले, मी हे सर्व नोबेल शांतता पुरस्कारासाठी नाही, तर जीव वाचवण्यासाठी केले आहे. काही लोक म्हणतात की २०२५ मध्ये मी अनेक महत्त्वाची कामं केली, पण माझं उद्दिष्ट पुरस्कार नव्हते तर शांतता निर्माण करणे होते. त्यांनी स्पष्ट केले की काही युद्धे त्यांनी केवळ शुल्क लावून थांबवली. भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सुरू झाला तेव्हा त्यांनी दोन्ही देशांना इशारा दिला होता की जर युद्ध सुरू राहिलं, तर अमेरिका त्यांच्या दोन्ही देशांवर १०० टक्के, १५० टक्के, अगदी २०० टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लादेल. ट्रम्प म्हणाले, मी म्हटलं, मी शुल्क लादत आहे आणि २४ तासांच्या आत तो प्रश्न सुटला. जर माझ्याकडे शुल्क लावण्याची ताकद नसती, तर ते युद्ध आजही सुरू असते.
ट्रम्प यांनी यापूर्वीही एका मुलाखतीत असाच दावा केला होता. त्यांनी सांगितले की त्यांच्या व्यापार धोरणामुळे जगभर शांतता प्रस्थापित झाली. मी सात शांतता करारांमध्ये मध्यस्थी केली आहे. त्यापैकी किमान पाच करार व्यापाराच्या माध्यमातून झाले आहेत. आम्ही लढणाऱ्यांशी तडजोड करत नाही, आम्ही त्यांच्यावर कर लादतो, असं ते म्हणाले. भारताने मात्र या दाव्याला नकार देत स्पष्ट केलं आहे की ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर झालेल्या युद्धबंदीमध्ये अमेरिकेची कोणतीही भूमिका नव्हती. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, त्या काळात घेतलेले सर्व निर्णय पूर्णपणे भारतीय सैन्य आणि नेतृत्वाच्या नियंत्रणाखाली होते.