तभा वृत्तसेवा
घाटंजी,
vijayadashami देशाचा विकास म्हणजे केवळ आर्थिक नसून देशाचा नागरिक संस्कारक्षम आणि देशभक्त होणे गरजेचे असून, तरच विकासाला अर्थ आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते नितीन जांभोरकर यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ घाटंजी नगराचा विजयादशमी उत्सव रविवार, 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजता श्री समर्थ विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. यावेळी जांभोरकर बोलत होते.
संध्याकाळी 5 वाजता शहरातील मुख्य मार्गाने शेकडो गणवेशधारी स्वयंसेवकाचे घोषासह पथसंचलन निघाले. यावेळी विशेष करून राष्ट्रसेविका समितीच्या स्वयंसेविकांनी मुख्य मार्गावर रांगोळ्या काढून सुशोभीकरण केले. तसेच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी व फुलांचा वर्षाव करत पथसंंचलनाचे ठिकठिकाणी स्वागत केले. मुख्य उत्सवात स्वयंसेवकांनी योग, व्यायाम योग व नियुद्धाचे प्रात्यक्षिक केले. मुख्य उत्सवात संघाचे विदर्भ प्रांत महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यप्रमुख नितीन जांभोरकर यांनी संघाचा शंभर वर्षांचा इतिहास आणि संघाचे आगामी जे पंच परिवर्तनाचे बिंदू आहेत जसे की, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, स्वबोध व नागरिक कर्तव्य त्यांचे विश्लेषण केले.विजयादशमी उत्सवाचे प्रमुख अतिथी, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी प्राचार्य देविदास टोंगे, तालुका संघचालक भरत तायडे व नगर कार्यवाह प्रवीण धानफुले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
संघाची शिस्त आणि संघकार्याचा विशेष उल्लेख प्रमुख अतिथी प्राचार्य देविदास टोंगे यांनी आपल्या भाषणात केला. प्रास्ताविक व परिचय नगर कार्यवाह प्रवीण धानफुले यांनी केले. यावेळी नगरातील पुरुष तथा भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.