मुंबई,
exotic animals smuggling छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाकडून तब्बल ६१ दुर्मीळ वन्यप्राणी जप्त करण्यात आले. या प्रकरणी संबंधित प्रवाशाला अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा तसेच संकटग्रस्त प्रजातींमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करार (CITES) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवाशाचे वर्तन संशयास्पद वाटल्याने त्याला थांबवून त्याच्या सामानाची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्याच्या बॅगेत दुर्मीळ आणि संकटग्रस्त प्रजातींचे अनेक सजीव प्राणी लपवलेले आढळले. या प्राण्यांमध्ये ब्लॅक ॲंड व्हाईट टेगु, कस्कस, सेंट्रल बेअर्डेड ड्रॅगन, होंडुरन मिल्क स्नेक यांसारख्या सरीसृप, सस्तन, उभयचर आणि कीटक प्रजातींचा समावेश होता.तत्काळ कारवाई करत सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी हे सर्व प्राणी ताब्यात घेतले आणि त्यांना वैद्यकीय उपचारासाठी 'रेस्क्युइंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' (RAW) या संस्थेकडे सुपूर्द केले. संस्थेचे संचालक पवन शर्मा यांनी सांगितले की, सुदैवाने बहुतेक प्राणी जिवंत होते. मात्र, लांबचा प्रवास, अपुरा ऑक्सिजन आणि लपवून ठेवण्याची पद्धत यामुळे काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या प्राण्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
या प्रकरणाची माहिती वन्यजीव गुन्हे नियंत्रण कक्षाला देण्यात आली असून तस्करीचा स्रोत, प्राण्यांचे मूळ ठिकाण आणि त्यामागील हेतू याबाबत सखोल तपास सुरू आहे. संबंधित प्रवाशाने हे प्राणी काय उद्देशाने आणले होते, याबाबत देखील चौकशी करण्यात येत आहे.थायलंड हा एक्झॉटिक प्राण्यांची तस्करी करणाऱ्यांसाठी प्रमुख केंद्र मानला जातो. तेथे अनेक दुर्मीळ प्रजातींना पाळण्याची कायदेशीर परवानगी असल्याने विक्रेते आणि तस्कर बिनधास्तपणे ऑनलाईन आणि समाजमाध्यमांद्वारे आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी संपर्क साधतात. भारतात मात्र अशा प्राण्यांची आयात, विक्री किंवा बाळगणे हे वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा आहे.
भारतामध्ये वन्यजीवांची तस्करी ही निसर्गाचे संतुलन बिघडवणारी आणि पर्यावरणासाठी गंभीर समस्या ठरत आहे. या तस्करीत अनेकदा जीवंत प्राण्यांना अमानुषपणे पिंजऱ्यात कोंबून, लपवून वाहतूक केली जाते. त्यामुळे अनेक प्राणी मार्गामध्येच मृत्युमुखी पडतात.सीमाशुल्क विभाग, वन विभाग आणि वन्यजीव संरक्षण संस्थांची समन्वयाने केलेली ही कारवाई देशात वन्यजीव तस्करीविरोधातील प्रयत्नांना बळ देणारी ठरली आहे. नागरिकांनीही अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृतीबाबत सजग राहून त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.