हे शहर फुललेले... फुलांनी बहरलेले

14 Oct 2025 15:41:46
नागपूर :
nagpur-news : महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर असलेल्या नागपूरची ओळख विविधांगी आहे. तलावांचे शहर, मंदिरांचे शहर, पुतळ्यांचे शहर, संत्रानगरी, ग्रीन सिटी, टायगर कॅपिटल आणि झिरो माईल सिटी अशीही या शहराची ओळख. या बरोबरच विविध प्रकारच्या फुलांनी बहरलेले शहर अशी नागपूरची नवीन ओळख गेल्या दोनेक दशकांत तयार झाली आहे. नागपूरच्या विविध रस्त्यांवर विशिष्ट प्रकारच्या फुलांनी बहरलेले रस्ते नागपूरकरांना नैसर्गिक सौंदर्याची आगळी अनुभूती देत आहेत.
 
 
 

TB
 
 
 
नागपूर महानगर पालिका, नागपूर सुधार प्रन्यास यासह इतर संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी, काही संस्था व निसर्गप्रेमी नागरिकांनी घेतलेल्या परिश्रमातून ही ओळख निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या मार्गावर वेगवेगळी अशी विशिष्ट प्रकारची फुलझाडे लावण्यात आल्याने त्या रस्त्यांनाही वेगळी ओळख मिळाली आहे. ही फुलझाडे बहरतात तेव्हा या रस्त्यांचे सौंदर्य त्या फुलांमुळे आणखी देखणे भासते. रस्तेच्या रस्ते एकाच प्रकारच्या फुलांच्या रंगाने बहरून येतात आणि त्यांच्या सुगंधाने वातावरण गंधित होते. नागपूरकरांना आताशः या सौंदर्याने आणि फुलांच्या गंधाने वेड लावले आहे.
 
 
फुलांनीच आता रस्त्यांची ओळख
 
 
एकाच प्रकारची फुलझाडे विशिष्ट रस्त्यांवर लावण्यात आल्याने आता शहरातील काही रस्ते त्या फुलांनी ओळखले जात आहेत.
 
 
नीरी रोड - अण्णा भाऊ साठे पुतळा ते आरटीपीएस मार्ग हा बकुळीच्या फुलांसाठी ओळखला जातो.
 
 
पाम रोड - आरबीआय चौक ते लेडीज क्लब चौक हा मार्ग सप्तपर्णी आणि कॅशियाच्या फुलांनी बहरतो.
 
 
आरबीआय ते झिरो माईल चौक या मार्गावर पिवळा गुलमोहर बहरलेला दिसतो.
 
 
लक्ष्मी भवन ते ट्रॅफिक पार्क आणि रामनगर ते अंबाझरी हे रस्ते राज्य फूल असलेल्या ताम्हण (जारूळ) फुलांनी बहरतात.
 
 
खामला ते देवनगर मार्ग सप्तपर्णीने सुगंधित होत असतो.
 
 
राजा राणी चौक ते भवन्स हा रस्ता पुत्रजिवा झाडांच्या फुलांनी सजतो.
 
 
पावले ही फुलांची...
 
 
विविध फुलझाडांनी नागपूरला फुलांचे शहर अशी नवी ओळख दिली आहे. या ओळखीचा उत्सव प्रत्येक नागरिकाला साजरा करता यावा यासाठी तरुण भारतच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून नागपूरकरांसाठी ‘पावले ही फुलांची’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला जाणार आहे. काय आहे हा उपक्रम? उद्याच्या अंकात वाचा...
Powered By Sangraha 9.0