गडचिरोली,
New traffic signals in Gadchiroli गडचिरोली शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी करून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची नवी दिशा मिळवून देण्यासाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून शहरातील महत्त्वाच्या दोन चौकांवर कोर्ट आणि आयटीआय चौक येथे आधुनिक ट्राफिक सिग्नल बसविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शहरातील वाहनसंख्या वाढल्यामुळे या चौकांवर दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत होती. विशेषतः कार्यालयीन वेळा आणि शालेय वेळेत नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. तसेच अपघातांची शक्यता देखील वाढली होती.

या पार्श्वभूमीवर वाहतुकीची व्यवस्था अधिक सुसंघटित व प्रभावी करण्यासाठी ट्राफिक सिग्नल बसविण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेरीस ही योजना मंजूर करण्यात आली. नवीन सिग्नल यंत्रणेमुळे चौकांवरील वाहतुकीचे नियोजन अधिक शिस्तबद्ध होणार असून नागरिकांच्या सुरक्षित प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे. या निर्णयाचे नागरिक, वाहनचालक व स्थानिक प्रशासनाने स्वागत केले आहे.