पानसरे हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन

14 Oct 2025 14:32:04
कोल्हापूर,
Pansare murder case चर्चेत असलेल्या कॉ.गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठा न्यायालयीन निर्णय समोर आला आहे. या प्रकरणातील डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळे या हत्याकांडातील सर्व १२ संशयितांना आता जामीन मिळाल्याने हा तपास नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. २०१५ मध्ये घडलेल्या या हत्याकांडात आजपर्यंत एकूण १२ संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी नऊ जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला होता, मात्र डॉ. तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर हे तिघे कळंबा कारागृहात होते. त्यांच्या जामीन अर्जांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडे सुनावणी झाली आणि न्यायालयाने तिघांनाही जामीन मंजूर केला.
 
Pansare murder case
 
 
 
या निर्णयानंतर सनातन संस्थेने प्रतिक्रिया देत निरपराध हिंदुत्वनिष्ठांना साडे नऊ वर्षे कारागृहात ठेवले, त्याची भरपाई कोण करणार?" असा प्रश्न उपस्थित केला आहे. संस्थेच्या प्रतिनिधींनी म्हटले की, पानसरे हत्या प्रकरणात निर्दोष हिंदुत्वनिष्ठांवर अन्याय झाला असून न्यायालयाचा हा निर्णय सत्यासमोर आणणारा आहे. २० फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.गोविंद पानसरे आणि त्यांची पत्नी उमा पानसरे यांच्यावर त्यांच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचे काही दिवसांनी निधन झाले. या हत्येने महाराष्ट्रासह संपूर्ण देशात खळबळ उडवली होती.
 
  
या प्रकरणाचा तपास करताना तपास यंत्रणांना सुरुवातीला कोणतेही ठोस पुरावे सापडले नव्हते. मात्र, पुढे दक्षिण भारतातील विचारवंत एम.एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांशी संबंधित तपासात काही धागेदोरे समोर आले. त्यानंतर पानसरे हत्या प्रकरणातही काही संशयितांना अटक करण्यात आली. सध्या सर्व १२ आरोपींना जामीन मंजूर झाल्यामुळे या प्रकरणाच्या पुढील न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तपास यंत्रणांकडून अद्यापही काही पुराव्यांचे विश्लेषण आणि पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. हा निर्णय केवळ आरोपींना दिलासा देणारा नाही, तर दीर्घकाळ चाललेल्या या प्रकरणात न्यायप्रक्रियेच्या पुढील टप्प्याची नांदी ठरणारा ठरत आहे.
Powered By Sangraha 9.0