शाळेचा रस्ता आणि अतिक्रमणाचा फास

14 Oct 2025 18:53:51
वर्धा, 
wardha-news : वर्धा शहर आता बजबजपुरी झाले आहे. रस्ते सिमेंटचे झाले मोठेही झाले. बाजूला गट्टूही लागले. परंतु, अतिक्रमणाने रस्त्यांची वाट लावली आहे. गजानन सायकर स्टोअर्सपासुन पुढे सिंदी (मेघे)कडे जाताना लेप्रसी फाऊंडेशनपुढे झालेले अतिक्रमन विद्यार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे. हे अतिक्रमण काढण्यात यावे तसेच ऑटो रिक्षाकरिता स्वतंत्र जागा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
 
 
jlk
 
शहर चौफेर वाढते आहे. शहराचा झपाट्याने विकास होतो आहे. शाळा, कॉलेज, दवाखाने, हॉटेल्सच्या इमारती उभ्या होत आहेत. यासोबतच रस्त्यावरही व्यवसाय करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. बजाज शाळेच्या बाजूला आता हातगाडीवर खाद्य पदार्थ विक्री करणार्‍यांची लांबलचक रांग लागली असते. त्यामुळे हा रस्ता सायंकाळी आकुंचित झालेला असतो पुढे रामनगर स्पोर्टिंग लबच्या मैदानावरही दुपारनंतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांची गर्दी होते. याच मार्गावर पुढे लेप्रसी फाऊंडेशनपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूने घराघरात दुकानं लागली आहेत.
 
 
याच मार्गावर कस्तुरबा हॉस्पिटलचा लेप्रसी फाऊंडेशनचा दवाखाना आहे तर पुढे जय महाकाली शिक्षण संस्थेंतर्गत चालणार्‍या शाळा, महाविद्यालय, विद्यालयीन विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि पुढे सावंगी मेघे गाव आहे. शहरापासुन हा परिसर लांब असल्याने तसेच महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, रुग्णालयात येणार्‍या रुग्णांकरिता याच परिसरात ऑटो उभे राहतात. दरम्यान, ऑटो उभे राहण्यासाठी या परिसरात एका बाजूला जागा आहे. परंतु, त्या ठिकाणी रस्त्यावरच अतिक्रमण करण्यात आले आहे. बाजूला असलेल्या रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची मागणी नगर पालिकेकडे करण्यात आली आहे. परंतु, रस्त्याही दुरुस्ती होत नसल्याने शाळा सुटण्याच्या वेळेत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रस्त्यावर उभे असलेले ऑटो आणि शाळेतून निघणारे विद्यार्थी, पालकांच्या वाहनांना मोठा अपघात होण्यापूर्वी या परिसरातील अतिक्रमण काढून सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे.
Powered By Sangraha 9.0