अकोला,
akola-diwali-2025 : सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीच्या प्रकाश उत्सवात यंदा आकाश सुध्दा सहभागी होणार असून, दोन नवीन धुमकेतू, पाच ग्रह, ग्रह युती आणि मृग नक्षत्रातील उल्का वर्षाव आकाश दिवाळी साजरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या दोन्ही उत्सवाचा आनंद घेण्याचे आवाहन विश्व भारतीचे प्रभाकर दोड यांनी केले आहे.
यंदा लांबलेला पाऊस आता परतीच्या वाटेवर असुन रात्रीच्या मोकळ्या आकाशात ग्रह तारे आपल्यासाठी नटून, सजून सज्ज आहेत.
ग्रामीण भागात शेंडे नक्षत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांब शेपटीच्या लेमन व स्वान या दोन आकाश पाहूण्यांचे आगमन एकाचवेळी होणार असल्याने खगोल प्रेमींसाठी एक पर्वणी असेल. यासाठी मात्र अंधाऱ्या भागातून निरिक्षण करावे.
सूर्यमालेतील आठ ग्रहांपैकी मंगळ, बुध, गुरु, शूक्र आणि शनी बघण्याची पर्वणी सध्या आहे.यात रात्रीच्या प्रारंभी पश्चिमकडे बुध आणि लाल रंगाचा मंगळ ग्रह तर पूर्व क्षितिजावर शनी ग्रहाचे तर मध्यरात्री गुरु व पहाटे शूक्र ग्रहाचे दर्शन घेता येईल. सोमवार २० ऑक्टोबर रोजी पहाटे कन्या राशीत चंद्र आणि शूक्र तर संध्याकाळी पश्चिमेस बुध व मंगळ ग्रह युती तूळ राशीत बघता येईल.
लक्ष्मी पूजनच्या रात्री उल्का वर्षाव
मंगळवार २१ ऑक्टोबरच्या रात्री बहूपरिचीत मृग नक्षत्रातून रात्री अकरा नंतर पूर्व आकाशात विविधरंगी उल्कारंभ होऊन पहाटे त्यांचा वेग वाढलेला पाहता येईल. अमावास्येच्या अंधाऱ्या रात्री हा अनोखा आकाश नजारा प्रत्येकाने आपल्या डोळ्यात साठवून दिवाळी आनंद घ्यावा असे आवाहन प्रभाकर दौड यांनी केले.