पाटणा,
BJP nominates Maithili Thakur भाजपाने बिहारच्या निवडणुकांसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून अलीनगर मतदारसंघातून लोकगायिका मैथिली ठाकूर यांना उमेदवारी मिळाली आहे. मंगळवारी बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांच्या उपस्थितीत मैथिली यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू झाली होती. बुधवारी ही अधिकृत घोषणा करण्यात आली. मैथिली यांच्यासोबतच भाजपाने बक्सरमधून माजी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा, हयाघाटमधून रामचंद्र प्रसाद आणि मुझफ्फरपूरमधून रंजन कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याआधीच्या यादीत ७१ उमेदवारांचा समावेश होता, तर या दुसऱ्या यादीत १२ नवीन उमेदवारांचा समावेश केला गेला आहे. त्यामुळे आता भाजपकडून एकूण ८३ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे.

अलीनगर मतदारसंघ हे दरभंगा जिल्ह्यातील महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ मानले जाते. ही सर्वसाधारण श्रेणीची सीट असून 2008 मध्ये सीमांकनानंतर स्थापन झाली होती. २०१० आणि २०१५ मध्ये आरजेडीच्या अब्दुल बारी सिद्दीकी यांनी सलग दोन वेळा या जागेवर विजय मिळवला होता. 2020 च्या निवडणुकीत व्हीआयपीच्या मिश्रीलाल यादव यांनी आरजेडीच्या विनोद मिश्रा यांचा पराभव करत विजयी ठरले. मिश्रीलाल यांना ६१,०८२ मते मिळाली, तर विनोद मिश्रा ५७,९८१ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले.
भाजपाने अलीनगरसह इतर ११ मतदारसंघांसाठीही उमेदवारांची निवड केली असून, या यादीत गोपालगंजमधून सुभाष सिंग, बनियानपूरमधून केदारनाथ सिंह, छपऱ्यामधून छोटी कुमारी, सोनपूरमधून विनय कुमार सिंग, रोजेरा (SC) मतदारसंघातून बिरेंद्र कुमार, बारहमधून सियाराम सिंग, आगिओन (SC) मतदारसंघातून महेश पासवान, शाहपूरमधून राकेश ओझा आणि बक्सरमधून आनंद मिश्रा यांचा समावेश आहे. मैथिली ठाकूर यांना अलीनगरमधून उमेदवारी मिळाल्यामुळे या मतदारसंघात राजकीय स्पर्धा तात्त्विक आणि लोकप्रियतेच्या दृष्टीने उत्सुकतेची झाली आहे. भारतीय जनता पक्षाने यापूर्वी अलीनगरमध्ये विजय मिळवण्यासाठी रणनीती ठरवली असून, आगामी निवडणुकीत याचा परिणाम दिसून येणार आहे.