शताब्दी वर्षात स्वयंसेवकांचे खरे कार्य सुरू होणार : गोविंद शेंडे

15 Oct 2025 11:29:45
तभा वृत्तसेवा
पांढरकवडा, 
govind-shende : मागील 100 वर्षांच्या कालावधीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जागतिक स्तरावर आपले कार्य विस्तारले आहे. संघाच्या प्रेरणेतून अनेक संघटना उभ्या राहिल्या आणि त्यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत परिवर्तन घडवून आणले. मात्र आगामी काळात ‘पंच परिवर्तन’च्या माध्यमातून स्वयंसेवकांचे खरे कार्य सुरू होणार असल्याचे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री गोविंद शेंडे यांनी केले.
 
 
y14Oct-Pandharkawda
 
 
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पांढरकवडा नगर आयोजित विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून गोविंद शेंडे म्हणाले, देश पुन्हा कधीही गुलाम होऊ नये या विचारातून संघाची स्थापना 100 वर्षांपूर्वी झाली. फक्त 15 वर्षांच्या अवधीत संघ देशाच्या सर्व राज्यांत पोहोचला. ‘मेरा देश, मेरी माती’ हा भाव नागरिकांच्या मनात दृढ करण्यासाठी संघ कार्यरत आहे.
 
 
या कार्यातूनच विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, राष्ट्र सेविका समिती यांसारख्या संघटनांचा जन्म झाला आणि आज त्या आपापल्या क्षेत्रात अग्रस्थानी आहेत. या यशामागे स्वयंसेवकांची शताब्दीभराची मेहनत आहे. त्यांनी पुढे सांगितले की, भविष्यात देशासमोर अनेक संकटे उभी राहणार आहेत, त्यामुळे आता स्वयंसेवकांचे खरे कार्य सुरू होणार आहे. संघाची प्रार्थना ही केवळ गीत नसून मंत्र आहे. त्याचे पालन करण्यासाठी नियमित शाखेत उपस्थित राहणे अत्यावश्यक आहे.
 
 
आगामी काळात स्वयंसेवकांनी कुटुंब एकत्रीकरण, सशक्तीकरण, पर्यावरण संतुलन, स्वदेशी वस्तूंचा प्रसार, मातृभाषेचा वापर वाढविणे, अस्पृश्यता आणि भेदभाव निर्मूलन, तसेच नागरी कर्तव्याचे पालन या विषयांवर विशेष काम करण्याचे आवाहन गोविंद शेडे यांनी केले.
 
 
या कार्यक्रमास जिल्हा संघचालक गोविंद हातगावकर, नगर संघचालक डॉ. किरण मायी व्यासपीठावर होते. प्रास्ताविक व आभारप्रदर्शन नगर कार्यवाह अमृत गंडरतवार यांनी केले. तर आपल्या सुरेख आवाजात उदय कुलकर्णी यांनी गीत गाऊन उपस्थित श्रोत्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
 
 
कार्यक्रमापूर्वी गावात पथसंचलन काढण्यात आले. शताब्दी वर्षानिमित्त गावभर स्वयंसेवकांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी प्रतिष्ठित नागरिक, महिला व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी स्थानिक स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0