गडचिरोली,
end of the Maoist era आजचा दिवस माओवादाच्या समाप्तीची सुरुवात दर्शवतो. 40 वर्षांपूर्वी अहेरी-सिरोंचा परिसरात माओवादी चळवळ उभी करणार्या भूपतीसारख्या वरिष्ठ नेत्याने 61 साथीदारांसह शस्त्र खाली ठेवणे ही देशाच्या इतिहासातील अत्यंत मोठी घटना आहे. यापूर्वी उत्तर गडचिरोलीतून माओवाद हद्दपार झाला आणि आजच्या या आत्मसमर्पणामुळे दक्षिण गडचिरोलीतही माओवादी चळवळ संपुष्टात येत आहे, असा नवीन इतिहास लिहिला जात आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली येथे झालेल्या आत्मसमर्पण कार्यक्रमात सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या प्रयत्नांतून माओवादी केंद्रीय समितीच्या वरिष्ठ नेतृत्वासह एकूण 61 जहाल माओवादी सदस्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सशस्त्र आत्मसमर्पण केले.
सर्वोच्च नेता भूपती उर्फ मल्लोजुल्ला वेणूगोपालराव याच्यासह दोन डिकेएसझेडसी सदस्य, दहा डिव्हीसीएम दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह सर्वांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 54 अग्निशस्त्रांसह आणि माओवादी गणवेशात आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पणानंतर सर्वांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संविधानाची प्रत देऊन लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्य गुप्तवार्ता आयुक्त शिरीष जैन, अप्पर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार माजी आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी अविश्यंत पांडा, पोलिस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, केंद्रीय राखीव पोलिस बलाचे उपमहानिरीक्षक (परिचालन) अजय शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, उरलेले 8 ते 10 माओवादी सदस्यांनीही आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, अन्यथा कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. गेल्या चार दशकांपासून माओवादामुळे गडचिरोलीचा विकास खुंटला होता. माओवादी युवकांना भ्रमात टाकून संविधानविरोधी व्यवस्था निर्माण करण्याचे स्वप्न दाखवत होते. मात्र समता आणि न्याय फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातूनच मिळतो, ही जाणीव झाल्यामुळे माओवादी आता आत्मसमर्पणाच्या मार्गावर येत आहेत. प्रत्येक आत्मसमर्पिताचे योग्य पुनर्वसन केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. आज आत्मसमर्पण केलेल्यांना एकूण 3 कोटी 1 लाख 55 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी आत्मसमर्पण केलेल्यांना स्थानिक उद्योगांमध्ये प्रशिक्षण देऊन नोकरी देण्यात आली असून, यापुढेही रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखून दिलेल्या माओवादविरोधी धोरणाचे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 2026 पर्यंत माओवाद उच्चाटनासाठी आखलेल्या रणनीतीचे मुख्यमंत्र्यांनी विशेष कौतुक केले. आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होणे किंवा पोलिस कारवाईला सामोरे जाणे हेच दोन पर्याय माओवाद्यांसमोर ठेवण्यात आल्याने देशभरात माओवादी चळवळ संपुष्टात येत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. प्रास्ताविकात पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितले की, 2021 पासून आतापर्यंत 140 माओवादी अटक झाले, 81 आत्मसमर्पण केले तर 93 जहाल माओवादी ठार करण्यात आले असल्याचे सांगीतले. कार्यक्रमात नक्षलपीडित कुटुंबांना धनादेशांचे वाटपही करण्यात आले. अपर पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला संबंधित अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.