समुद्रपूर,
leopards-den-at-menkhat मेणखात परिसरात बिबट्याच्या हालचालींनी गावकर्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार १३ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास नारायण बावणे यांच्या घरासमोरील अंगणात असलेल्या श्वानाला बिबट्याने उचलून नेला. या घटनेमुळे गावात दहशत निर्माण झाली आहे.

तालुक्यातील जंगलशेजारील गावांमध्ये वाघ, बिबट्यांची मोठी दहशत पसरली आहे. या वन्य प्राण्यांनी आतापर्यंत अनेक जनावरांना आपले भक्ष्य बनविले आहे. शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या जनावरांवर हल्ले करून ठार करीत आहे. आता चक बिबट्याने गावातूनच श्वानाला उचलून नेल्याने गावकर्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. नारायण बावणे यांच्या घरासमोर बसून असलेल्या श्वानाला बिबट्याने उचलून नेले. पोलिस पाटलांनी ही बाब वनविभागाला कळवली. माहिती मिळताच वनरक्षक शशिकांत शेंद्रे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक शेंद्रे यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता श्वानाला ओढत नेल्याच्या खुणा तसेच पावलांचे ठसे आढळले. प्राथमिक तपासात तो बिबट असल्याचे निष्पन्न झाले. leopards-den-at-menkhat नागरिकांच्या मते, काही दिवसांपासून लगतच्या कारडा गावात जनावरांच्या हालचालीत अस्वस्थता आणि श्वानांचा भुंकण्याचा आवाज ऐकू येत होता. दरम्यान, वनविभागाने संध्याकाळनंतर घराबाहेर न पडण्याचे, लहान मुले व पाळीव प्राणी सुरक्षित ठेवण्याचे आवाहन गावकर्यांना केले आहे. बिबट्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून परिसरात सापळे आणि कॅमेरे लावण्याची काम सुरू करू, असे वनरक्षक शेंद्रे यांनी सांगितले. यावेळी पोलिस पाटील प्रगती मंगरुडकर, रमेश विहिरकर, गजानन सुरजुसे, रेखा बावणे, विनोद सुरजुसे, रोहित सुरजुसे, ज्योती मंगरुडकर, रितिक महाकाळकर, प्रताप मंगरुडकर गावकर्यांची उपस्थिती होती.