वाचनाने व्यक्तित्व घडते, आयुष्य समृद्ध होते: अ‍ॅड.जाधव

15 Oct 2025 18:08:47
वाशीम, 
vijay-jadhav : वाचन माणसाला प्रगल्भ बनवते. बहुश्रृत बनवते. ज्ञानी बनवते, अफाट वाचन आणि अभ्यासामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती घडविली. वाचन ही अशी क्रांतिकारी बाब आहे. वाचन आपले व्यक्तित्व घडवते आणि आयुष्य समृद्ध करते, असे भाष्य व्यंकटेश सेवा समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार अ‍ॅड. विजय जाधव यांनी १५ ऑटोबर रोजी व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
 
 
 
JADHAV
 
 
 
महाराष्ट्र शासनाची मराठी भाषा समिती, शासकीय जिल्हा ग्रंथालय, आणि व्यंकटेश सेवा समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. जाधव होते. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय काळे, निवृत्त प्राचार्य भास्कर गायकवाड, सतीश राठी स्मृती सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रंगनाथ पांडे, विदर्भ साहित्य संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रा. गजानन वाघ, तांत्रिक सहाय्यक नरेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
 
मोबाइलमुळे पुस्तक वाचनावर मोठा परिणाम होत असल्याचे नमूद करून अ‍ॅड. जाधव पुढे म्हणाले, की क्रमिक पुस्तकांपेक्षाही अवांतर पुस्तके मनावर खोल संस्कार करतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रेरणा जागृत व्हावी, म्हणून असे कार्यक्रम प्रेरक आणि उद्बोधक ठरतात. वाचनाचा संस्कार बालमनावर रूजविण्यासाठी शिक्षक आणि पालकांनी कटाक्षाने लक्ष द्यायला हवे, असे ते म्हणाले.
 
 
दीप प्रज्वलन आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. उत्कृष्ट वाचक म्हणून अक्षर वाड्मय संस्थेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळविणारे वाचक प्राचार्य भास्कर गायकवाड यांनी आपले वाचनानुभव कथन केले. ग्रामीण कथा -कादंबरीकार बाबाराव मुसळे यांनी विद्यार्थ्यांना लेखन आणि वाचन प्रक्रिया बारकाईने समजावून सांगितली. विद्यार्थ्यांशी हितगूज करताना मुसळे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. गजानन वाघ आणि डॉ. विजय काळे यांचीही समयोचित भाषणे झाली.
 
 
महेश कढणे यांनी सूत्रसंचलन केले. सौ. सुशीलाताई जाधव विद्यानिकेतनचे प्राचार्य श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे यांनी भूमिका विशद करून विद्यार्थी आणि जिल्हावासीयांनी जिल्हा ग्रंथालयाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रामा इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य दुर्गा कढणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
कार्यक्रमस्थळी राजे वाकाटक वाचनालयाने भरविलेले ग्रंथ प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. मान्यवर वत्यांच्या उद्बोधना सोबतच या ग्रंथप्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा जागृत झाली. ग्रंथपाल संतोष काळमुंदळे आणि कर्मचार्‍यांनी यासाठी पुढाकार घेतला. या प्रदर्शनात बाल साहित्यासोबतच कथा, कादंबरी, नाटके, प्रेरक साहित्य अशी विविध प्रकारची पुस्तके ठेवण्यात आली होती.
Powered By Sangraha 9.0