शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा

15 Oct 2025 20:05:41
बुलढाणा, 
mla-sanjay-gaikwad ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेचे विकसित स्वरूपात रूपांतरण करण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे. ही शिक्षणाची धुरा जिल्हा परिषदेचे सर्व शिक्षक समर्थपणे पार पाडीत आहेत. मात्र आगामी काळात बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात बुलढाणा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी केले.
 
 
mla-sanjay-gaikwad
 
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आज गर्दे वाचनालय सभागृहात जिल्हा शिक्षक गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. mla-sanjay-gaikwad गेल्या सहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार समारंभ आज पार पाडला. बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सोहळ्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन , उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार, शिवशंकर भारसाकळे, प्रमोद एंडोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश राठोड, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर , समाज कल्याण अधिकारी डॉ. अनिता राठोड शिक्षणाधिकारी विकास पाटील, अनिल आकाळ, डॉ. वैशाली ठग, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक सतीश देशमुख , कृषि विकास अधिकारी पुरूषोत्तम अनगाईत, जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना आ. संजय गायकवाड म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला जिल्हा शिक्षक गौरव पुरस्काराचा हा सोहळा आज संपन्न होत आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे निश्चितच अभिनंदन केले पाहिजे. एकाच वेळी तब्बल 70 शिक्षकांचा सपत्नीक गौरव करण्याचा हा भव्य दिव्य समारंभ निश्चितच उल्लेखनीय आहे. गौरव प्राप्त शिक्षकांनी आपले ज्ञान हे केवळ आपले सहकारी शिक्षक व शाळा इतक्यापुरतेच मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील अन्य शाळांना सुद्धा त्याचा लाभ होईल, या दृष्टीने प्रयत्न करावा, असे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
 
आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रशासन वेळोवेळी प्रयत्नशील असून कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच निपुण महाराष्ट्र, मिशन झेड इत्यादी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष दिल्या जाईल असे सांगितले. mla-sanjay-gaikwad त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षण हे केवळ पुस्तकातील अभ्यासापुरतेच मर्यादित न राहता प्रत्येक विद्यार्थ्याचा त्याच्या कलागुणानुसार ,व्यक्तिमत्त्वानुसार विकास कसा होईल या दृष्टीने सुद्धा प्रत्येक शिक्षकाने विचार केला पाहिजे, असे आवाहन केले केले. यापुढे सुद्धा विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी सोबतच शाळेतील उपस्थिती व गुणवत्ता या बाबींकडे प्रशासनाकडून विशेष लक्ष केंद्रित केल्या जाणार असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले.
 
आपल्या प्रास्ताविक पर भाषणात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी शिक्षक गौरव पुरस्काराची पार्श्वभूमी विशद केली तसेच काही तांत्रिक व अपवादात्मक बाबींमुळे प्रलंबित असलेला हा 70 शिक्षकांचा गौरव सोहळा आज संपन्न होत असल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांचे आभार व्यक्त करून यापुढे सुद्धा नियमितपणे उपक्रमशील शिक्षकांना वेळोवेळी गौरवान्वित करण्यात येईल असे सांगितले. यावेळी डॉ. जगराम भटकर यांनी सुद्धा समयोचित मार्गदर्शन केले.
 
या समारंभात सन 2018-19 ते 2024 25 यामागील सहा वर्षातील शिक्षक गौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या 70 शिक्षकांचा सपत्नीक शाल ,श्रीफळ, साडी, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषदेच्या वतीने इयत्ता अकरावीतील होतकरू व गुणवंत तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या मिशन झेड या उपक्रमात योगदान देणाऱ्या विविध शिकवणी संस्था संचालक व जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या कलावंतांचा सुध्दा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देंऊन सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे निपुण महाराष्ट्र या शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमात संपूर्ण राज्यात बुलढाणा जिल्ह्याने तृतीय स्थान प्राप्त केल्याबद्दल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. जगराम भटकर ,शिक्षणाधिकारी विकास पाटील, अनिल आकाळ, डॉ. वैशाली वैशाली ठग यांचा सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल गौरव प्राप्त शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना आनंद व्यक्त केला. तसेच शिक्षक संघटना प्रतिनिधींनी सुद्धा प्रशासनाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद शिंगाडे यांनी तर आभार प्रदर्शन उपशिक्षणाधिकारी अनिल देवकर यांनी केले.
Powered By Sangraha 9.0