राऊतांचा दिल्लीत लेटर बॉम्ब...आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत

16 Oct 2025 12:12:59
नवी दिल्ली,
Raut's letter bomb in Delhi शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या एका लेटर बॉम्बने राज्यराजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेतृत्वाला पत्र लिहिले असून, त्याचे परिणाम महाराष्ट्रातही जाणवू लागले आहेत. या पत्रामुळे महाविकास आघाडीतील राजकीय ताण आणि मतभेद पुन्हा एकदा उफाळण्याची शक्यता आहे.
 

Raut 
 
राऊत यांनी पत्राद्वारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत सामील करण्याची आपली भूमिका मांडली आहे. तथापि, या पत्रातील काही मुद्यांवरून काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. विशेषतः महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात केलेले टीकेचे सूर या नाराजीत भर घालणारे ठरले आहेत. माहितीनुसार, राऊत यांनी दिल्लीत काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांना पत्र पाठवून मनसेला आघाडीत सामावून घेण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, थेट प्रदेशाध्यक्षांविषयी तक्रारीचे सूर वापरण्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी याआधीच मनसेसोबत कोणतीही आघाडी नको, अशी ठाम भूमिका घेतली होती आणि राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा करूनच निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. काँग्रेस नेत्यांच्या मते, राज ठाकरे यांच्याबाबत पक्षात कोणतीही पूर्वचर्चा झाली नाही. तसेच, राज ठाकरे यांचा समावेश केल्यास परप्रांतीय भाषिक मतदार वर्गावर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशीही पक्षाला चिंता आहे. सर्व घडामोडींमुळे महाविकास आघाडीतील राजकीय समीकरणात नवे ताण निर्माण झाले असून, मनसेच्या संभाव्य सहभागावर सस्पेन्स वाढला आहे. संजय राऊत यांच्या या पावलामुळे आघाडीतील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.
Powered By Sangraha 9.0