दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाचा महाराष्ट्रात अलर्ट!

16 Oct 2025 11:40:01
मुंबई,
Return of rains in Maharashtra दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच महाराष्ट्रात परतीच्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. नुकतेच अतिवृष्टीच्या फटक्याने सावरत असलेले शेतकरी आता नव्या पावसाच्या इशाऱ्यामुळे चिंतेत आहेत. हवामान विभागाने आज आणि उद्या (१७ ऑक्टोबर) छत्रपती संभाजीनगर, जळगाव, पुणे, सातारा, अहमदनगरसह १५ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. काहींची जमीन वाहून गेली, तर काहींचे कष्टाचे पीक हातात येण्याआधीच नष्ट झाले. अशात पुन्हा परतीच्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या आहेत.
 
 
Return of rains in Maharashtra
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद परिसरात गुरुवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. याच काळात शेतकरी सोयाबीन काढणीच्या कामात गुंतलेले होते. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना गंजी झाकण्यासाठी आणि पिक वाचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आधीच अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजावर हा नवीन पावसाचा तडाखा पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात महापुराच्या लाटांनी शेकडो एकर शेती जमीन उद्ध्वस्त केली आहे.
 
दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. काढणीस तयार असलेले सोयाबीन तातडीने काढून सुरक्षित ठिकाणी साठवावे, वाळल्यानंतर मळणी करावी, तसेच पिकात आणि फळबागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. तूरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने अतिरिक्त पाण्याचा निचरा करणे अत्यावश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती पुन्हा एकदा आव्हानात्मक ठरत आहे, तर हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन राज्य प्रशासनही सतर्क झाले आहे.
Powered By Sangraha 9.0