भाऊसाहेबांचे जन्मगाव पापळ येथे कृषी महाविद्यालय

17 Oct 2025 21:03:28
अमरावती, 
agricultural-college-at-papal श्री शिवाजी शिक्षण संस्थेची महत्त्वाची मागणी राज्य सरकारने आज पूर्ण केली. भाऊसाहेबांच्या जन्मगावी म्हणजे पापळ येथे शासनाने आज आदेश काढून कृषी महाविद्यालय सुरू करण्यास मान्यता दिली. संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे विशेष आभार मानले आहे.
 
 
agricultural-college-at-papal
 
महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाच्या वतीने शुक्रवारी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत श्री शिवाजी शिक्षण संस्थेस पापळ ता. नांदगाव खंडेश्वर येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची विशेष बाब म्हणून परवानगी देण्यात आली आहे. शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जन्मगावी म्हणजे पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करण्यात येत होते. अखेर श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील कार्यकारिणीला हे यश मिळाले. agricultural-college-at-papal शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये काही अटी व शर्तीवर ही मान्यता प्रदान करण्यात आली आहे. सत्र २०२५ - २०२६ पासून ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्याअटीवर हे कृषी महाविद्यालय कायमस्वरूपी,विनाअनुदानित तत्त्वावर सुरू करण्यास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. मागणी पूर्ण झाल्याबद्दल संस्थेने संपूर्ण कार्यकारिणीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे आभार मानले. यासोबतच या मागणीच्या पूर्तते करिता ज्यांचे विशेष सहकार्य लाभले असे आ. प्रताप अडसड व आ. रणधीर सावरकर यांचे देखील संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. दरम्यान संस्थेला पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी मिळाल्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये पेढे वाटून आज आनंद व्यक्त करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0