वर्धा,
forensic-van-in-wardha पोलिस यंत्रणा अधिक बळकट व सुदृढ करण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू आहे. मोबाईल फॉरेन्सिक लॅब, वाहने, बसेस, सीसीटीव्ही आदी अत्याधुनिक उपकरणे देऊन पोलिस विभागाचे बळकटीकरण करण्यात येत असून पोलिस दलाच्या आधुनिकतेमुळे गुन्ह्यांची उकल करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
देवळी येथे सीसीटीव्ही सरव्हेलन्स सिस्टीम, फॉरेन्सिक व्हॅनच्या लोकार्पण प्रसंगी ना. डॉ. भोयर बोलत होते. यावेळी आ. राजेश बकाने, आ. समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस, पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूरचे उपसंचालक अश्विन गेडाम, देवळीचे पोलिस निरीक्षक अमोल मंडाळकर आदी उपस्थित होते. ना. डॉ. भोयर पुढे म्हणाले, देवळीसारख्या छोट्या शहर व परिसरात २२ ठिकाणी ८८ सीसीटीव्ही लावण्यात आले असून त्यामुळे गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यत केला. वर्धा येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळा लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे विविध गुन्हांची उकल लवकर करण्यास मदत होईल. पोलिस पाटील, पोलिस कर्मचारी यांच्या पाल्यांना कौशल्य विभागाच्या माध्यमातून राज्यभरात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे ना. भोयर यांनी सांगितले.
आ. बकाणे म्हणाले, नागरिक आतुरतेने सीसीटीव्ही लागण्याची वाट पाहत होते. अवघ्या पाच महिन्याच्या कालावधीत देवळी शहर व परिसरातील सीसीटीव्ही कार्यरत झाले. देवळी व पुलगाव येथे नवीन पोलिस स्टेशन इमारत व वसाहतीची निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आ. कुणावार यांनी पोलिस दलाचे आधुनिकीकरण झाल्यामुळे दिवसेंदिवस गुन्ह्यांची उकल होण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना चांगली सेवा देता यावी म्हणून पोलिस भरती सुद्धा होणार असल्याचे ते म्हणाले. माजी खासदार रामदास तडस यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे नागरिकांना होणारा त्रास सीसीटीव्हीच्या निगराणीमुळे कमी होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यत केला. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी केले तर आभार निरिक्षक अमोल मंडाळकर यांनी मानले.