पहाटेच्या झुळकीतून झरले स्वर!

17 Oct 2025 20:46:00
वर्धा, 
wardha-news दीपोत्सवाच्या आनंदात न्हाऊन निघाला दिवाळीचा पहिला म्हणजे शुक्रवारचा दिवस! संगीताच्या सुरांनी, भावगीतांच्या गंधाने आणि रसिकांच्या टाळ्यांच्या निनादात पहाटेच्या झुळकीतून स्वर झरत होते. स्थानिक केसरीमल शाळेच्या प्रांगणावर त्रिवेणी संस्थेच्या दिवाळी पहाट या कार्यक्रमाने वर्धेकरांना संगीतमय अनुभूती दिली. सुर्याची कोवळी किरणं हलकेसे गरम वाटू लागली तरीही वर्धेकर रसिक खिळून होते.
 

wardha-news
 
डी.एस. फर्निचर प्रायोजीत या संगीत सोहळ्यात मुंबई, पुणे आणि नागपूरवरून खास आलेल्या नामांकित युवा कलाकारांनी रसिकांच्या मनात स्वररंग उधळले. कार्यक्रमाची सुरूवात प्रभू राज चंद्राचे स्वयं श्रीरामप्रभू ऐकती कुशलव रामायण गाती... या भक्तिरसाळ गीताने झाली. त्यानंतर अथर्व यांनी संत नामदेवांच्या अभंगात तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल सादर करत भावनांना नवा उन्मेष दिला. तेजोमय नादब्रह्म ले... ने सभोवताल शुद्ध स्वरांच्या झंकाराने न्हावून गेला. पुढे गाईड चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या आवाजातील पिया तोसे नैना लागे रे या राग खमाजवरील गाण्याने रसिकांच्या हृदयाला भिडले. मजरुह सुलतानपुरी आणि मदन मोहन यांच्या अप्रतिम जोडीने साकारलेले तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा या है... या राग झिझोंटीवरील गीताने सभागृहात एक वेगळीच रोमँटिक लय निर्माण केली. कैलाश खेर यांचे हिरे मोती मैं न चाहूं, तु जो प्यार से... अथर्व यांच्या आवाजात दुमदुमले, तर जयश्री यांनी गायलेले नाम गुम जाएगा, चेहरा ये बदल जाएगा गीत रसिकांच्या मनात घर करून गेले. wardha-news श्रीरंग यांच्या आवाजात गाता रहे मेरा दिल... आणि गौरी शिंदे यांच्या आवाजात लग जा गले या अमर गीतांना श्रोत्यांनी दाद दिली. अथर्व यांनी सादर केलेले अवघे गरजे पंढरपूर या नाट्यपदाने अभिषेकींच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमातील सर्व कलाकारांचे स्वागत त्रिवेणी संस्थेच्या महिला कार्यकर्त्यांनी सूतमालांनी केले. महेश मोकलकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे संयोजन आणि निवेदन वृषाली देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला प्रसिद्ध उद्योजक अरुण लेले, डॉ. अभ्युदय मेघे, माधव पंडित, डॉ. किरण खेर, अरुण काशीकर, प्रदीप दाते, मनीष सराफ, आदींसह रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0