गडचिरोली,
gadchiroli-news : माओवादाने दीर्घकाळ ग्रासलेल्या गडचिरोलीत शांततेचा दीप प्रज्वलित ठेवण्यात ज्यांनी बलिदान दिले, त्या शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिवाळीचा आनंद पोहोचविण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने एक हृदयस्पर्शी उपक्रम राबविला. 16 ऑक्टोबर रोजी अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.
जिल्ह्यातील विविध सुरक्षा दलांतील 213 जवानांनी कर्तव्य बजावताना बलिदान दिले आहे. त्यांच्या शौर्याचा सन्मान करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. दोरजे म्हणाले की, गडचिरोली पोलिस दलातील जवानांनी माओवादाविरुद्ध लढताना अद्वितीय शौर्य दाखवले आहे. त्यांच्या बलिदानामुळेच जिल्हा आज माओवादमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. शहीदांचे कुटुंब हे आमचेच कुटुंब असून, महाराष्ट्र पोलिस नेहमी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
भावनिक वातावरणात दिवाळीचा आनंद वाटून घेताना अधिकारी आणि उपस्थित नागरिकांनी देशभक्तीची भावना पुन्हा अनुभवली. याप्रसंगी पोलिस उप-महानिरीक्षक अंकित गोयल, पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासह अपर अधीक्षक एम. रमेश, गोकुल राज जी उपस्थित होते.