वरूड,
son-killed-his-father तालुक्यातील अमडापूर येथील भाजीपाला उत्पादक शेतकरी असलेल्या साबळे कुटुंबातील बापलेकात गुरुवार १६ ऑक्टोबर रोजी वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून पोटच्या मुलानेच बापाची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.

प्रल्हाद गंगाराम साबळे (८५) असे मृतक बापाचे नाव असून योगेश प्रल्हाद साबळे (४०) असे आरोपी लेकाचे नाव आहे. मृतकाची पत्नी रेखा प्रल्हाद साबळे यांनी दिलेल्या पोलिस तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. son-killed-his-father सूत्रांच्या माहितीनुसार, अमडापूर येथून जवळच असलेल्या राजुरा बाजार येथे आठवडी बाजार असल्याने ते दोघे सकाळी ८ वाजता शेतातील भाजीपाला बाजारात विक्रीस आणण्यासाठी शेतात गेले होते. योगेश हा विकृत व रागीट स्वभावाचा असल्याने काही कारणास्तव त्याचा वडिलांसोबत वाद झाला व तो विकोपाला गेला. यातच त्याने वृद्ध वडिलांच्या डोक्यावर काहीतरी मारून गंभीर जखमी केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात वार्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी एकच गर्दी केली. घटनेची माहिती पोलिस पाटील तानाजी सावंत यांना दिली. या घटनेची तक्रार मृतकाची पत्नी रेखा प्रल्हाद साबळे हिने वरूड पोलिसांत दिली. या तक्रारीवरून वरूड पोलिसांनी आरोपी गुन्हा दाखल करून शोध घेत त्याला अटक केली. घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खांडेकर, ठाणेदार अर्जुन ठोसरे यांनी पहाणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात हलवला व शविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.