वर्धा,
satoda-sarpanch शहरानजिक असलेल्या साटोडा ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गौरव गावंडे, सदस्य नरेश होणाडे, प्रतीभा महेश अनकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार त्यांना पदावरून अपात्र ठरवावे, अशी मागणी माजी सरपंच हरिष विरुटकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सरपंच व दोन्ही सदस्यांना दिलासा देणारा निर्णय दिला.

तक्रारीनुसार, सरपंच गौरव गावंडे आणि सदस्य नरेश होणाडे यांनी सार्वजनिक मालमत्तेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करण्यात आला होता. सदस्य प्रतीभा अनकर यांच्यावर कर अथवा शुल्क भरण्यात दुर्लक्ष केल्याचा आरोप होता. त्यामुळे तिघांनाही सदस्य पदावरून अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. satoda-sarpanch या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी ग्रामपंचायत सचिव, ग्रामविकास अधिकारी आणि वर्धा पंचायत समितीचे बीडीओ यांच्याकडून अहवाल मागवला होता. प्राप्त अहवालावर आधारित निर्णयात हरिष विरुटकर यांनी केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दोन स्वतंत्र आदेश काढले. पहिल्या आदेशात गौरव गावंडे व नरेश होणाडे यांच्याविरोधातील अर्ज अमान्य ठरवण्यात आला तर दुसर्या आदेशात प्रतीभा अनकर यांच्याही सदस्यत्वाबाबत दिलासा देण्यात आला. या निर्णयामुळे साटोडा ग्रामपंचायतीचे सध्याचे सरपंच व दोन्ही सदस्य आपले पद कायम राखणार आहेत. विशेष म्हणजे आरोप करणारे आणि आरोप झालेले दोन्हीही एकाच पक्षातील सदस्य आहेत.