‘स्क्रब टायफस’चा शिरकाव : नागरिकांनो खबरदारी घ्या !

17 Oct 2025 17:54:57
वाशीम, 
Scrub Typhus : जिल्ह्यामध्ये ‘स्क्रब टायफस’ या दुर्लक्षित परंतु गंभीर आजाराचा शिरकाव झाला असून, संभाव्य धोका लक्षात घेता, जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने जनजागृती मोहीम सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चव्हाण यांनी जनतेला या आजाराच्या लक्षणांबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूक राहण्याचे कळकळीचे आवाहन केले आहे. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. ठोंबरे यांनी आरोग्य विभागाला हा आजार पसरू नये म्हणून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे आणि दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 

SCRUB 
 
 
 
जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरिएंटा टुसूगामुशी’ नावाच्या जीवाणूमुळे पसरतो. प्रामुख्याने झुडपांमध्ये वस्ती करणार्‍या ‘माईट’ नावाच्या विशिष्ट किटकाने चावल्यामुळे हा आजार माणसांना होतो. शेतकरी, शेतमजूर आणि जंगलात काम करणार्‍या लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. जिल्ह्यातील नागरिकांना, विशेषतः शेती आणि जंगल परिसरात काम करणार्‍यांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. स्क्रब टायफस हा एक गंभीर आजार असला तरी योग्य ती खबरदारी घेतल्यास तो निश्चितच टाळता येतो. नागरिकांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
झाडाझुडपात काम करताना पूर्ण बाह्यांचे आणि पायघोळ कपडे वापरावेत. कामासाठी बाहेर जाणे अपरिहार्य असल्यास, उघड्या अंगाला व कपड्यांना किटक प्रतिबंधक लोशन लावावे. कामावरून आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवून धुवावेत. घराभोवतीची लहान - मोठी खुरटी झाडे व झुडपे काढून परिसर स्वच्छ ठेवावा. ताप, डोकेदुखी, अंगदुखी किंवा किटक चावलेल्या जागी ‘इशार’ नावाचा छोटा अल्सर दिसल्यास, तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करावी.
 
 
जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, स्क्रब टायफसवर वेळेवर उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता, केवळ शासकीय रुग्णालयात त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा आणि उपचारांसाठी सहकार्य करावे. ‘आपले आरोग्य, आपली जबाबदारी!’ या भावनेने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Powered By Sangraha 9.0