sky-lanterns-diwali दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला असून विविध आकारांतील आकाशदिव्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. कागदी, कापडी, लाकडी, ज्युटच्या आकाशदिव्यांनी यंदाची दिवाळी लखलखणार आहे. रंगबेरंगी आकाशदिवे ग्राहकांना आकर्षित करत असून यंदा दरांमध्ये काहीशी वाढ अनुभवण्यात आली आहे.
बाजारात सध्या ३ इंचापासून ते तब्बल ६ फूट उंचीचे आकाशदिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लाल, पिवळा, निळा, सोनेरी, अशा विविध रंगांमध्ये आणि पारंपरिक तसेच आकर्षक डिझाइनमधील हे आकाशदिवे ग्राहकांना भुरळ घालत आहेत. गेल्या काही वर्षांपासून गोल, षट्कोनी, डायमंड आकाराचे, जाणता राजा, स्वामी समर्थ व फोटो फ्रेम प्रकारचे आकाशदिवे लोकप्रिय ठरत आहेत. कागदी आकाशदिव्यांसोबतच ज्युट व लाकडापासून बनवलेले टिकाऊ आकाशदिवे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. याशिवाय एमडीएफ मटेरिअलपासून बनवलेले आकाशदिवे देखील बाजारात उपलब्ध असून गेल्या तीन-चार वर्षांपासून त्यांना चांगली मागणी आहे. हे कंदील काहीसे महागडे असले तरी टिकाऊपणामुळे ग्राहक प्राधान्य देत आहेत. sky-lanterns-diwali लहान ज्युट व लाकडी आकाशदिवे १० ते १२ इंच ४०० ते ६०० रुपयात, मध्यम आकाराचे १२ ते १८ इंच ५०० ते १२०० रुपयात उपलब्ध आहेत. या आकाशदिव्यांची निर्मिती शहरातील काही सामाजिक संस्थांकडून करण्यात येते. टिकाऊ आकाशदिव्यांचा वापर केल्याने प्रदूषण कमी होत आहे. तसेच हे आकाशदिवे वर्षानुवर्षे टिकतात, असे विक्रेत्यांनी सांगितले.