गडचिरोली,
Devrao Holi : भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त येत्या 15 नोव्हेंबर रोजी देशभरात ‘जनजाती गौरव दिन’ साजरा करण्यात येणार असून या पृष्ठभूमीवर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली व गडचिरोली जिल्हा शाखेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘पंचपरिवर्तन सूत्र’ राबविण्याचा पुढाकार घेत असून आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचपरिवर्तन सूत्रांची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती परिषदचे नेते व माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आज आयोजित पत्र परिषदेत दिली.
आदिवासी समाजातील जनजागृती, परंपरा, संस्कृती आणि सामाजिक परिवर्तनासाठी ‘कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्य पालन आणि स्व-जागृती’ ही पंचसूत्री समाजामध्ये लोकसहभागातून दृढपणे रुजविण्याचे उद्दिष्ट परिषदेने ठेवले आहे. या माध्यमातून समाजातील वाईट चालीरीतींना आळा घालून आत्मनिर्भर व एकसंघ समाज उभारण्याचे लक्ष्य आहे.
पंचपरिवर्तन सूत्रांद्वारे समाजात मानसिक व सामाजिक क्रांती घडविण्याचा निर्धार परिषदेकडून व्यक्त करण्यात आला असून, या उपक्रमात लेखक, विचारवंत, इतिहासकार व सामाजिक नेतृत्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन डॉ. होळी यांनी केले. पत्रपरिषदेला परिषदेच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या महिला जिल्हाध्यक्षा पुष्पलता कुमरे, उपाध्यक्ष वामन जुनघरे, भूषण अलामे, निलेश आत्राम, सुरज मडावी आदी उपस्थित होते.