पाकिस्तानी हवाई हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटू ठार

18 Oct 2025 09:21:19
काबुल,
Afghan cricketer killed in airstrike पाकिस्तान आणि अफगाण तालिबानमधील सुरू असलेला तणाव आणखी तीव्र झाला आहे. दोन्ही देशांनी ४८ तासांच्या युद्धबंदीला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शविल्यानंतर काही तासांतच पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तीन अफगाण क्रिकेटपटूंसह अनेक नागरिक ठार झाले आहेत. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या आग्नेय पक्तिका प्रांतातील उर्गुन आणि बर्मल जिल्ह्यांवर बॉम्बहल्ले केले. हे हल्ले निवासी भागांवर झाले असून, त्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या हल्ल्यात कबीर, सिबगतुल्ला आणि हारून हे तीन तरुण अफगाण क्रिकेटपटू ठार झाल्याची पुष्टी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) केली आहे.
 
 
 
Afghan cricketer killed in airstrike
एसीबीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज संध्याकाळी पाकिस्तानी राजवटीने केलेल्या भ्याड हल्ल्यात पक्तिका प्रांतातील उर्गुन जिल्ह्यातीलक्रिकेटपटूंचे प्राण गेले. या दुर्दैवी घटनेने आम्ही अत्यंत व्यथित आहोत.बोर्डाने स्पष्ट केले की, हे खेळाडू एका मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात सहभागी होऊन उर्गुन येथे परतले होते. घरी परतल्यानंतर स्थानिक मेळाव्यात त्यांच्यावर हवाई हल्ला झाला. या हल्ल्यात क्रिकेटपटूंसह उर्गुन जिल्ह्यातील पाच नागरिक ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाल्याचे एसीबीने सांगितले. बोर्डाने म्हटले आहे की, “ही केवळ मानवी हानी नाही, तर अफगाणिस्तानच्या क्रीडा समुदायासाठी मोठा धक्का आहे. आमचे हे खेळाडू देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेहनत घेत होते.
 
 
या घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानसोबत होणाऱ्या आगामी तिरंगी टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही मालिका नोव्हेंबरच्या अखेरीस अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार होती. दरम्यान, अफगाण वृत्तवाहिनी टोलो न्यूजच्या अहवालानुसार, पाकिस्तानने या हल्ल्यांद्वारे दोन्ही देशांमधील अलीकडच्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले आहे. सीमावर्ती भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चकमकींनंतर या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा भडकला आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानातील क्रीडाप्रेमींमध्ये संताप उसळला आहे. सोशल मीडियावर “#JusticeForAfghanCricketers” हा हॅशटॅग ट्रेंड होत असून, नागरिकांनी पाकिस्तानविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.या हल्ल्यानंतर प्रादेशिक शांततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, राजकीय वैर आता क्रीडा क्षेत्रातही झिरपताना दिसत आहे.
Powered By Sangraha 9.0