विष्णू मनोहर यांचे ‘न थांबता २५ तास दोसे’

18 Oct 2025 19:28:48
अमरावती, 
Vishnu Manohar : प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी शनिवारी सकाळी स्वत:चाच विश्वविक्रम मोडण्याकडे वाटचाल सुरू केली. सुमारे वर्षभरापुर्वी नागपूर येथे सलग २४ तास दोसे बनविण्याचा अफलातून विक्रम त्यांनी नोंदवला होता. आता त्यात पुढचे पाऊल टाकून अमरावतीत ‘न थांबता २५ तास दोसे बनविणे’ या विश्वविक्रमाला ते गवसणी घालणार आहेत. अमरावतीकरांनी चटणीसह या दोस्यांचा आस्वाद घेण्यासाठी एमआयडीसी मार्गावरील गुणवंत लॉनवरील ‘विष्णूजी की रसोई’ मध्ये मोठी गर्दी केली होती.
 
 
 
vishnu
 
 
 
प्रथम येणार्‍यास प्राधान्य या तत्वावर येथे नि:शुल्क दोसे वितरीत केले जात आहेत. यासोबत हिंदी, मराठी गाण्याचे गायन, विविध कलांचे सादरीकरण करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी ७ वाजेपासून या उपक्रमाला सुरूवात झाली. पहिल्या दोन तासांत सुमारे ७५० दोसे तयार झाले. पहिला तयार झालेला दोसा शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर येथे पाठविण्यात आला. या उपक्रमाची सांगता रविवारी सकाळी ८ वाजता होणार आहे. या उपक्रमाला अमरावतीकरांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे, अशी माहिती विष्णूजी की रसोईच्या संचालिका ओजस्वीनी असनारे यांनी दिली.
 
 
विष्णू मनोहर यांनी गेल्या वर्षी नागपूर येथे ‘सलग २४ तास दोसे’ करण्याचा नवा विश्वविक्रम रचला होता. त्यांनी २४ तासात तब्बल १४ हजार ४०० दोसे तयार केले होते. विश्व विक्रम नोंदविताना विष्णू मनोहर यांना दोस्याचे ५०० किलो बॅटर आणि शंभर किलो चटणी लागली होती. अमरावतीत त्याहून अधिक उडद डाळ, तांदूळ दोस्यांचे बॅटर तयार करण्यासाठी लागली आहे. सोबतच चटणीसाठी खोबरे, दही, मिर्ची, मोहरी, मिठ आणि कढीपत्ता हे जिन्नस उपयोगात आणले जात आहेत.
Powered By Sangraha 9.0