भाडेकरूने घरात केलेल्या गुन्ह्यासाठी घरमालक जबाबदार कसा ?

18 Oct 2025 14:24:39
अनिल कांबळे
नागपूर, 
Nagpur News : घरात भाडेकरु ठेवल्यानंतर त्याने घरात काही गुन्हेगारी कृत्य किंवा अवैध कृत्य केल्यास घरमालकाला जबाबदार धरता येणार नाही. कारण त्या कृत्यात घरमालकाचा काेणताही सहभाग नसताे, असे महत्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नाेंदवले. अकाेल्यातील एका प्रकरणात भाडेकरुने वीजचाेरी केल्यानंतर घरमालकाविरुद्ध गुन्हा नाेंदविण्यात आला हाेता. मात्र, न्यायालयाने घरमालकाची निर्दाेष सुटका केली. न्या. नंदेश देशपांडे आणि न्या.उर्मिला जाेशी-फळके यांच्या खंडपीठाने घरमालक नविन प्रकाशसिंह ठाकूर यांच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचा निर्णय दिला.
 
 
 
 
ngp rent
 
 
 
हा गुन्हा वीज कायदा कलम 135 अंतर्गत पाेलिस स्टेशन अकाेट येथे नाेंदविण्यात आला हाेता. महावितरणच्या भरारी पथकाला 25 ऑगस्ट 2020 राेजी केलेल्या तपासणीत ठाकूर यांच्या मालकीच्या औद्याेगिक परिसरात वीजचाेरी झाल्याचे आढळले हाेते. तपासात असे निष्पन्न झाले की, भाडेकरू सय्यद एजाज सय्यद फैय्याज आणि रुपाली वाघ यांनी मीटरची छेडछाड करून वीजचाेरी केली हाेती. या गैरप्रकारामुळे पाच महिन्यांत 5 लाख 26 हजार रुपयांचा महावितरणला ताेटा झाला हाेता. याचिकाकर्ते ठाकूर यांनी न्यायालयात सांगितले की, त्यांनी संबंधित जागा भाड्याने दिली हाेती आणि करारामध्ये स्पष्ट नमूद केले हाेते की, भाडेकरू वीजेचा गैरवापर केल्यास ताेच जबाबदार राहील. ठाकूर यांनी कराराचे उल्लंघन झाल्यानंतर भाडेकरूला नाेटीस दिली आणि न्यायालयात दाद मागितली हाेती. नंतर दिवाणी न्यायालयानेही भाडेकरूला जागा रिकामी करण्याचे आदेश दिले हाेते.
घरमालकाला शिक्षा नकाे
 
 
उच्च न्यायालयाने याप्रकरणात निरीक्षण नाेंदविले की, वीजचाेरी करणारा व्यक्ती नेहमीच ग्राहक असणे आवश्यक नाही आणि या प्रकरणात वीज वापरणारा (भाडेकरू) वेगळा हाेता. त्यामुळे केवळ मालकी हक्काच्या आधारे मालकावर गुन्हा दाखल करणे हे ‘कायद्याचा गैरवापर’ असल्याचे न्यायालयाने म्हटले. घरमालकावर दाखल केलेला गुन्हा कायम ठेवणे हे याेग्य नव्हे, असे नमूद करत न्यायालयाने गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.
Powered By Sangraha 9.0