नागपूर,
vijay wadettiwar राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर गंभीर आरोप करत एक व्हिडिओ माध्यमांसमोर सादर केला. या व्हिडिओमध्ये वडेट्टीवार हे मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगेंसोबत चर्चा करताना दिसतात, आणि त्यावरून भुजबळ यांनी असा दावा केला की, वडेट्टीवार ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण करणाऱ्या भूमिकेचा पाठिंबा देत आहेत.या आरोपाला प्रत्युत्तर देताना विजय वडेट्टीवार यांनीही भुजबळांवर सडकून टीका केली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जरांगे पुराण आता बस्स झालं, आता सरकार पुराण सुरू करा. आरक्षणाचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोनदा जीआर काढण्यात आला. त्यामुळे संघर्ष सरकारच्या निर्णयाविरोधात हवा.”
वडेट्टीवार म्हणाले की, “मी भुजबळांचा कधीच विरोध केला नाही. त्यांच्या भूमिकेवर कधी टीका केली नाही. पण त्यांनी मला लक्ष्य का केलं, हेच समजत नाही.”काल बीड येथे भुजबळांच्या नेतृत्वात पार पडलेल्या ओबीसी आरक्षण एल्गार सभेवरही वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केले. “सत्ताधारी पक्षच आंदोलन करत असेल, तर निर्णय घेणार कोण? मंत्रिमंडळात ओबीसी समाजाचे अनेक प्रतिनिधी आहेत. त्यांनी आता ठोस भूमिका घेतली पाहिजे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.या साऱ्या घडामोडींमुळे मराठा व ओबीसी आरक्षणाचा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. आंदोलनं, मोर्चे आणि राजकीय आरोपांच्या गर्दीत सामान्य ओबीसी समाजाला न्याय कधी मिळणार, हा खरा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.