वर्धा,
Pankaj Bhoyar : बचत गटामार्फत तयार करण्यात येणार्या विविध वस्तू बाजारपेठेत टिकतील अशा स्वरूपाच्या तसेच गुणवत्तापूर्ण व स्पर्धात्मक स्वरुपाच्या असाव्या. यामुळे गटाच्या वस्तूंना बाजारपेठ मिळून महिलांना आर्थिक संपन्न होता येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापक उमेद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संयुत वतीने बसस्थानक परिसरात पाच दिवसीय वर्धा वर्धिनी दिवाळी फराळ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकारी स्वाती तांबे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात उमेदची चळवळ मोठ्या प्रमाणात असून उमेदमार्फत बचतगटातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. बचत गटातील महिलांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार उत्पादन करुन बाजारपेठेत टिकेल असे वस्तूंचे दर ठेवावे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम व प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उद्योग व्यवसायासाठी कर्ज योजनेंचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. भोयर यांनी केले.
यावेळी बचतगटातर्फे निर्मित विविध वस्तूच्या लावण्यात आलेल्या स्टॉलला ना. डॉ. भोयर यांनी भेट देऊन गटातील महिलांशी संवाद साधला. प्रास्ताविक वैशाली रसाळ यांनी केले. संचलन मिलींद झामरे यांनी केले तर आभार उमेदचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक निरज नखाते यांनी मानले.