पंढरपूर,
wrath of the Warkari sect पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना दिलेल्या दिवाळी भेटवस्तूंवरून सध्या संतापाचे वारे उसळले आहेत. मंदिरातील सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना बीव्हीजी ग्रुपकडून दिवाळी निमित्त भेटवस्तू म्हणून “चिकन मसाला” देण्यात आल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे वारकरी संप्रदाय आणि भक्त वर्गात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. वारकरी परंपरेत शाकाहार, संयम आणि साधेपणा हे जीवनाचे आधारस्तंभ मानले जातात. मांसाहार आणि त्यासंबंधित कोणत्याही वस्तूंना विठ्ठलाच्या भूमीत स्थान नसते. अशा पवित्र स्थळी ‘चिकन मसाल्या’सारखी भेटवस्तू दिल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे सोशल मीडियावर आणि वारकरी संप्रदायात या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील सुरक्षारक्षक, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सेवा आऊटसोर्सिंग पद्धतीने बीव्हीजी कंपनी पुरवते. मे महिन्यापासून ५ कोटी ७७ लाख रुपयांच्या ठेक्यावर कंपनीने मंदिरात सुमारे २२० सुरक्षारक्षक पुरवण्यास सुरुवात केली होती. या सुरक्षारक्षकांचा उपयोग मंदिर परिसर, दर्शन रांगा आणि यात्रेदरम्यान सुरक्षा व्यवस्थेसाठी केला जातो. तथापि, दिवाळीच्या निमित्ताने कंपनीकडून कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या, त्यात चिकन मसाल्याचे पाकीट असल्याचे उघड झाल्यानंतर वाद निर्माण झाला. मंदिराच्या धार्मिक नियमावलीनुसार अशा वस्तूंचा वापर किंवा वितरण कडेकोटपणे प्रतिबंधित आहे. त्यामुळे वारकरी आणि भक्तगणांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या बीव्हीजी कंपनी या वादाच्या भोवऱ्यात सापडली असून, मंदिर समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. विठ्ठल मंदिराच्या पवित्र परंपरेवर असा आघात सहन केला जाणार नाही, असा इशारा वारकरी संप्रदायाने दिला आहे.