दिनेश गुणे
India pharmaceutical industry गेल्या वर्षी, 22 ऑगस्ट 2024 या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक आश्वासक माहिती दिली आणि संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली. भारताला ‘जगाचे औषधालय’ अशी जागतिक मान्यता मिळाली असून, भारतीय औषध उद्योगाने जगाच्या आरोग्यपूर्ण जीवनशैलीत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे, असेही मोदी यांनी जाहीर केले. त्या दिवशी देशातील अनेकांस कोविड महामारीचा तो जीवघेणा काळदेखील नक्कीच आठवून गेला असेल.
हा काळ जीवनमरणाच्या संघर्षातील कसोटीचा काळ होता. त्याआधीच्या शंभर वर्षांत असा संघर्ष देशानेच नव्हे, तर जगानेही अनुभवला नव्हता आणि जीव वाचविण्याचे जेवढे मार्ग त्या क्षणी उपलब्ध होते, त्यावर आपले पाऊल पहिल्यांदा पडावे म्हणून एक भयंकर जीवघेणी स्पर्धादेखील सुरू होती. एका अकल्पित भयपटाचे वास्तविक रूप जग अनुभवत असताना, भारताच्या औषध उद्योगाने देशाला आणि जगाला दिलासा देणाऱ्या औषधांची निर्मिती केली. कोविडच्या संसर्गाने प्रतिबंध करणारी लस विक्रमी काळात तयार करून विश्वबंधुत्वाच्या सांस्कृतिक प्रेरणेतून जगातील अनेक देशांच्या नागरिकांसाठी ही लस उपलब्ध करून देण्याचा संकल्प भारताने सोडला आणि जागतिक राजकारणाच्या पटलावर भारताच्या बंधुभावाच्या परंपरेचे एक आगळे दर्शन घडले. एका पूर्णपणे अनोळखी आजाराशी सामना करण्याची वेळ आल्यामुळे जग भांबावून गेले होते.
या आजारावर India pharmaceutical industry नेमके उपचार कोणते याची वैद्यकविश्वासही कल्पना नव्हती आणि केवळ वेगवेगळ्या प्रयोगांतून आजारास प्रतिबंध करण्याचे केविलवाणे प्रयत्न सुरू झाले होते. अनेकांना त्याचे विपरीत परिणामही भोगावे लागले, अनेक जणांनी योग्य औषधोपचाराच्या प्रतीक्षेतच अखेरचा श्वास घेतला, तर अनेकांच्या अकाली मृत्यूचे गूढ वलय वैद्यकविश्वासही उकलता आले नाही. अशा काळात भारताच्या औषधनिर्मिती व्यवसायाने संकटाशी सामना करण्याकरिता स्वत:स झोकून दिले. त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आणि महामारीच्या संकटाशी सामना करणे शक्य आहे, ही धीर देणारी जाणीव रुजू लागली. जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी, मृत्यूचे थैमान थांबविण्यासाठी ही बाब मोठी दिलासादायक ठरली होती. या काळात लस पुरवठा करण्यात, वेगवेगळी औषधे पुरविण्यात आणि वैद्यकीय उपचारांकरिता आवश्यक ती साधने पुरविण्यात या औषधनिर्मिती उद्योगाने कर्तव्यभावाने जी जागतिक भूमिका बजावली, त्याला जगाकडून मिळालेली ही मान्यतेची पावती होती.
साहजिकच, तेव्हा निर्माण झालेली भारतीय औषधनिर्मिती व्यवसायाची ही प्रतिमा सातत्याने उजळ राहील याची खबरदारी घेण्याची जबाबदारीही या उद्योगावर पडली होती. तरीही, त्या काळात या प्रतिमेवर डाग लागणाऱ्या काही अप्रिय घटनांचाही या उद्योगास सामना करावा लागला होता. रेमडेसीवीर नावाचे एक औषध कोविडला प्रतिबंध करू शकते, असे दिसू लागल्यावर ते उपलब्ध व्हावे यासाठी रुग्णांनी व असंख्य नागरिकांनी केलेल्या जीवघेण्या संघर्षाच्या कहाण्या अजूनही अंगावर शहारे आणतात आणि त्या मरणकाळाच्या आठवणी नकोशा होऊन जातात. एका बाजूला जगाच्या आरोग्यासाठी झटणाèया औषधनिर्मिती व्यवसायात जीवघेण्या स्पर्धेचाही शिरकाव झाला, नफेखोरीचा कलंकही लागला आणि त्यातून बनावटगिरीनेही संधी साधून आरोग्यासमोर आव्हानेदेखील उभी केली. संकटाआडून फसवणुकीच्या संधी साधून खिसे भरू पाहणाèया प्रवृत्तींचे दर्शनही त्या जीवघेण्या काळात घडून गेले आणि माणुसकी नावाच्या भावनेला कलंक लागला. याच रेमडेसीवीरच्या एका इंजेक्शनसाठी हजारो रुपये मोजण्याची तयारी असलेल्या लाखो रुग्णांना त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत असताना, बनावट रेमडेसीवीरचा साठादेखील उजेडात येऊ लागला. निव्वळ पॅरासिटामॉलचे पाणी भरलेल्या बाटल्यांवर रेमडेसीवीरचे लेबल लावून त्या बाजारात विकणाèया टोळ्यादेखील या काळात उजेडात आल्या आणि विश्वाचे औषधालय असलेल्या भारताच्या औषध उद्योगात प्रतिमा जपण्याचे खडतर आव्हान पेलणे सहज व सोपे नाही याचीही जाणीव अधोरेखित झाली. महाराष्ट्रात बारामती येथे सातारा जिल्ह्यातील एका रुग्णाचा या बनावट रेमडेसीवीरमुळे मृत्यू झाला होता. या जीवघेण्या साथीशी संघर्ष करताना सामान्य माणसे हतबल झाली असून जगण्यासाठी काहीही करण्याची त्यांची धडपड सुरू असल्याचे पाहून बारामती परिसरातील काही विकृत मानसिकतेच्या माणसांनी वेगवेगळ्या इस्पितळांतील रेमडेसीवीरच्या रिकाम्या बाटल्या गोळा केल्या व त्यामध्ये पॅरासिटामॉलचे पाणी भरून त्या मूळ औषध म्हणून भरमसाट दराने विकण्यास सुरुवात केली. यातील एका इंजेक्शनमुळे एका रुग्णाला मृत्यू पत्करावा लागला, तेव्हा या बनावटगिरीवर प्रकाश पडला आणि कारवाईचे फास आवळले गेले.
असे म्हणतात, की दुधाने तोंड पोळले की ताकदेखील फुंकून पिण्याची सावधगिरी आपोआप मनात रुजते. त्या बनावट रेमडेसीवीर प्रकरणानंतर औषध व्यवसायाभोवती संशयाचे धुके दाटले. कोणतेही औषध घेण्याआधी, त्याच्या खरेपणावरच प्रश्नचिन्हे उमटत होती, पण सामान्य माणसांकडे खरेपणाची शहानिशा करण्याचे मार्ग मात्र मर्यादितच असतात. विश्वासू दुकानातून औषधे घ्यावीत, त्यावरील लेबल तपासून पाहावे, त्या औषधनिर्मिती कंपनीची पृष्ठभूमी जाणून घ्यावी एवढीच काही अशा औषधांची विश्वासार्हता तपासण्याची मर्यादित साधने हाताशी असलेल्यांना मूळ बाटलीतील औषधे बनावट असू शकतात याची कदाचित जाणीवही नसावी. त्यामुळेच, काही औषध उत्पादक कंपन्यांना आपली प्रतिमा व प्रतिष्ठा सिद्ध करण्याचे आव्हानही पेलावे लागले. नव्याने प्रतिष्ठित होऊ पाहणाèया औषधनिर्मिती कंपन्यांसाठी तर हा काळ अस्तित्वाची कसोटी ठरविणारा होता. त्यावर मात करून जेव्हा जगाने भारताच्या औषधनिर्मिती उद्योगावर मान्यतेची मोहर उमटवली, भारत ही जगाची औषधशाळा आहे हे पंतप्रधानांनी जाहीर केले, तेव्हा या उद्योगाला कसोटी पार पाडल्याचे असीम समाधान अनुभवता आले आणि औषध उद्योगावरील सामान्य माणसाचा विश्वास दुणावला. जुलै 2023 मध्ये भारतीय औषधांची निर्यात 2.13 अब्ज डॉलर्स एवढी होती. जुलै 2024 मध्ये त्यामध्ये तब्बल 8.36 टक्के वाढ नोंदवली गेली आणि भारतीय औषध उद्योगाने 2.31 अब्ज डॉलर्स किमतीची औषधे निर्यात केली होती. त्या एका आर्थिक वर्षात औषधांच्या निर्यातीत सुमारे 85 टक्के वाढ झाल्याचे जाहीर करून पंतप्रधानांनी या उद्योगाचे अभिनंदन केले. अमेरिका, बेल्जियम, दक्षिण आफ्रिका, ब्राझील, इंग्लंडसह जगभरातील सुमारे 200 देशांत भारतीय औषधांची निर्यात होते. त्या दशकात भारतीय जैवतंत्रज्ञान क्षेत्रासाठी 13 पटींनी झळाळी आली आणि 2014 मध्ये 10 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेले हे क्षेत्र 2024 च्या अखेरीस 130 अब्जांच्या उलाढालीने तेजाळले.
आरोग्य हा प्रत्येक जीवाचा मौलिक मूलभूत अधिकार आहे. तो जपला गेला पाहिजे, याकडे देशाच्या राज्यघटनेचाही कटाक्ष आहे. त्यामुळे, आरोग्यसेवेत वेळोवेळी जाणवणाèया त्रुटी दूर करून ही सेवा अधिकाधिक प्रभावी व्हावी अशी जनतेचीही अपेक्षा असते. कोविड महामारीच्या काळात या क्षेत्रातील असंख्य त्रुटी स्पष्ट झाल्या आणि जीवघेण्या संकटकाळाशी सामना करण्यातील तोकडेपणाही सिद्ध झाला. या क्षेत्रात बरीच मजल मारली असली, तरी अजूनही पुढील वाटचाल मोठी आहे, याची जाणीव या संकटाने करून दिली होती. त्यामुळेच, गुणवत्ता व नैतिकतेस प्राधान्य देणे अपरिहार्य ठरले. ‘प्रत्येक नागरिकास आरोग्यपूर्ण जीवनाचा अधिकार’ हे उद्दिष्ट स्वीकारून सन 2000 पर्यंत ते साध्य करण्याचा संकल्प 1975 साली केंद्र सरकारने सोडला होता. औषध व्यवसाय क्षेत्र अधिकाधिक सक्षम व आत्मनिर्भर कसे होईल, यावर अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी एक समितीही 1975 मध्ये स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या अहवालाने या क्षेत्रासाठी वाटचालीची नेमकी दिशा आखून दिली, असे म्हटले जाते. उच्च गुणवत्तेची औषधे परवडणाèया किमतीत उपलब्ध झाली पाहिजेत, यावर या समितीने भर दिला होता. त्यासाठी गुणवत्ता व मूल्य नियंत्रणाची यंत्रणा निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली आणि या व्यवसायाच्या वाटचालीला शिस्त लागली.
अर्थात, या प्रतिष्ठेला गालबोट लावणाèया काही घटनांची अलिकडच्या काळातील नोंद अस्वस्थ करणारी आहे. उझबेकिस्तानमध्ये भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळे बालकांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जगाच्या या औषधालयावरील विश्वासावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात या औषधाविरोधात सावधगिरीच्या सूचना जारी केल्या, तेथील न्यायालयात खटले दाखल झाले आणि संबंधितांना शिक्षादेखील झाली. जगाचे औषधालय म्हणून प्रतिष्ठा प्राप्त होत असलेल्या भारतीय औषध उद्योगाची ही एक प्रकारची फजिती होती. मात्र, त्यानंतरही या उद्योगात भेसळ आणि बनावटगिरीचे धंदे सुरूच राहिल्याचे अलिकडच्या काही जीवघेण्या घटनांवरून स्पष्ट झाले. राजस्थान आणि मध्य प्रदेशातही, खोकल्याचे औषध घेतल्यामुळे बालके दगावल्याच्या घटनांमुळे या क्षेत्रात खळबळ माजली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या औषधाचा वापर न करण्याचा इशारा जगाला दिला आहे, तर भारतातील बाजारपेठेतून हे औषध मागे घेण्यात आले आहे. खोकल्यावरील औषधे हा एक सर्वसाधारण उपचार मानला जातो. सर्दी, खोकल्यासारख्या आजारावरील उपचाराकरिता दवाखाने गाठण्याची सवय सामान्य जनतेस नाही.
केवळ आपल्या India pharmaceutical industry अनुभवाच्या आधारे किंवा औषध विक्रेत्याच्या सल्ल्याने औषधे घेण्याचाही अनेकांचा कल असतो. त्यामुळे, खोकल्यावरील औषधोपचारांचे मान्यताप्राप्त निकषही सर्वांस माहीत नाहीत. याच अनुभवामुळे अशा आजारांवरील औषधांचा दर्जा राखण्याची नीती मागे पडली असावी. प्लॅस्टिक उद्योगात आणि रंग, शाई निर्मितीसाठी वापरल्या जाणाèया डायथिलिन ग्लायकॉल नावाच्या घातक रसायनाचा प्रमाणाबाहेर करण्यात आलेला वापर हे या मृत्युकांडाचे कारण असल्याचा निष्कर्ष आता पुढे येत आहे. या रसायनाची अतिरिक्त मात्रा शरीरात गेल्यास पचनसंस्था व मूत्रसंस्थांच्या कार्यास अडथळे निर्माण होतात व प्रसंगी ते जीवघेणेही ठरतात. हे स्पष्ट असूनही या औषधामध्ये त्याचा वापर करणे हा निव्वळ गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा ठरतो. या निष्काळजीमुळेच अनेक जीव काळाआड गेले आणि वेळीच उघडकीस आल्याने मोठ्या संकटापासून बचाव करणे शक्य झाले असले तरी हा केवळ चिंतेचा विषय नाही, तर या व्यवसायातील नैतिकतेने कोणता स्तर गाठला आहे याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहेच. केवळ खोकल्याच्या औषधाच्या जागतिक बाजारपेठेवरही आज भारताचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. भारतातून अनेक देशांत खोकल्यावरील औषधांची निर्यात होते. ही निर्यात सुमारे साडेपाच अब्ज डॉलर्सची असून येत्या पाच-सात वर्षांत हा आलेख सात अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठेल असे चित्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत खोकल्यावरील औषधांमुळे भारतातच अनेक जीवघेणे प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहेत.
सुमारे पाच India pharmaceutical industry दशकांपूर्वी चेन्नईत 14 बालकांचा या औषधातील डायथिलिन ग्लायकॉलच्या भेसळीमुळे मृत्यू झाला होता. 1986 मध्ये मुंबईत याच रसायनाची भेसळ असलेल्या ग्लिसरिनमुळे 14 जण मरण पावले, तर 2020 मध्ये जम्मूच्या उधमपूर जिल्ह्यात याच भेसळीमुळे 12 बालके दगावली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विषारी कफ सिरपच्या या मृत्युकांडाने खळबळ माजलेली असतानाच आता मध्य प्रदेशातील ग्वालियर येथे एका सरकारी इस्पितळात, बालकांच्या सामान्य आजारावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाèया प्रतिजैविकाच्या बाटलीत चक्क किडे आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. औषधनिर्मिती उद्योगातील नीतिमत्तेवर प्रश्नचिन्हे उमटविणाऱ्या या घटना सामान्य नाहीत. वेगवेगळ्या नावांनी, प्रतिष्ठित कंपन्यांची लेबले वापरून दुय्यम दर्जाची किंवा बनावट औषधे बाजारात घुसविण्याचे प्रकार समोर येत आहेत.
विशेष म्हणजे, बनावट औषधांच्या वेष्टणांवरील लेबले, पॅकिंग, हे मूळ औषधाएवढेच हुबेहूब असल्याने, बनावटगिरीचा संशयदेखील न येता ग्राहक डोळे मिटून त्याची खरेदी करत असल्याने बनावट औषधांची समांतर बाजारपेठच उदयास येत असून आरोग्याच्या मूलभूत हक्काला आव्हान दिले जात आहे. बनावट औषधांचा व्यापार करणारे एक जाळे देशभर पसरल्याची भीती व्यक्त होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मतानुसार, बनावट औषधांच्या समांतर बाजारपेठांची उलाढालही अब्जावधींच्या घरात असून यापैकी अनेक उत्पादनांत औषधी गुणधर्म तर नाहीतच, उलट जीवघेण्या पदार्थांचीच भेसळ असल्याने आजार बरे होण्याऐवजी जिवावर बेतण्याचीच शक्यता अधिक असते. काही बनावट औषधे धोकादायक नसली, तरी आजार बरे करण्याची क्षमताही त्यामध्ये नसते. काही बनावट औषधे तर केवळ नशा करण्यासाठीही वापरली जात असल्याचे उघडकीस आले आहे. केवळ माणसांकरिता असलेल्या औषधांतच नव्हे, तर प्राण्यांवरील उपचारांकरिता वापरल्या जाणाऱ्या औषधांतही भेसळ होत आहे आणि त्यात अशा औषधांचाही काळाबाजार होत आहे. बनावट औषधांच्या उघडकीस येणाèया प्रकारांत मुख्यत: कर्करोग, मूत्रपिंडविकार, हृदयरोग, मधुमेह, स्नायू विकारांवरील उपचाराकरिता वापरल्या जाणाèया औषधांचाच भरणा अधिक असल्याने, थेट जिवावर बेतणाèया या संकटाचे वाढते आक्रमण चिंताजनक आहेच, पण या क्षेत्रात भारताने प्रस्थापित केलेल्या जागतिक प्रतिष्ठेेवर यामुळे प्रश्नचिन्हही उभे राहिले आहे. ज्या क्षेत्राकडे आश्वस्ततेने पाहावयाचे, त्याच क्षेत्रामुळे आरोग्य व्यवस्था अस्वस्थ झाली आहे. हे चित्र बदलायला हवे.