मुंबई/नागपूर,
Devendra Fadnavis जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील अंगणवाड्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उपक्रमांतर्गत आतापर्यंत 76 अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. या माध्यमातून बालकांच्या आरोग्य, शिक्षण आणि सर्वांगीण विकासात निश्चितच लक्षणीय सुधारणा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री यांच्या या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी जेएसडब्ल्यू फाउंडेशनने पुढाकार घेतला असून कळमेश्वर तालुक्यातील एकूण 100 अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, हात धुण्याची सुविधा आणि वीजजोडणी यांसारख्या मूलभूत सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संपूर्ण सहकार्य करतील, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या उपक्रमामुळे कळमेश्वर तालुका बालमैत्रीपूर्ण आणि दर्जेदार अंगणवाड्यांचा आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 76 अंगणवाड्यांनी आवश्यक 32 निकष पूर्ण करून आयएसओ मानांकन प्राप्त केले आहे. जेएसडब्ल्यू फाऊंडेशनच्या अध्यक्षा संगीता जिंदल यांनी सांगितले की, 2018 पासून फाऊंडेशन कळमेश्वर तालुक्यात बालकांची काळजी आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. अंगणवाड्यांचे थिमॅटिक पेंटिंग, शिक्षण साहित्य उपलब्ध करणे, सेविकांना प्रशिक्षण देणे अशा विविध उपक्रमांद्वारे अंगणवाड्यांचे दर्जात्मक उन्नयन करण्यात येत आहे. उर्वरित अंगणवाड्यांचे उन्नयनाची कार्यवाही सुरू असून लवकरच सर्व 100 अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.