नागपूर,
Mahal area air quality, गेल्या काही दिवसांत शहरातील हवेची गुणवत्ता लक्षणीयरीत्या घसरली आहे. चांगल्या श्रेणीत असलेली हवा आता वाईट श्रेणीत पोहोचली आहे. पाच ते सहा दिवसांपासून आकाश निरभ्र झाल्यानंतर प्रदूषणाच्या पातळीत झालेला हा बदल स्पष्टपणे जाणवत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) माहितीनुसार, हवामानातील बदल आणि प्रदूषण नियंत्रण घटकांतील अनियमिततेमुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता चिंतेचा विषय ठरत आहे. हिवाळ्यात तापमानात घट होते. थंड, दाट हवेचा थर तयार होतो. या थरामुळे प्रदूषणकारी घटक हवेत अडकून राहतात. त्यामुळे उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या तुलनेत हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक वाढते. रात्री वाहनांची संख्या कमी असली, तरी अनेक ठिकाणी अनधिकृतपणे कचरा जाळला जातो. त्यामुळे रात्रीच्या वेळीही हवेतील प्रदूषणाचे प्रमाण अधिक दिसते. या गोष्टी लक्षात घेऊन महापालिकेने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
अलिकडे पावसाचे दिवस जास्त असल्यामुळे हवेतील प्रदूषण कमी होते. कारण पावसामुळे धूळ आणि कण जमिनीवर बसतात. त्यामुळे त्या काळात हवेची गुणवत्ता चांगल्या श्रेणीत होती. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतल्याने पुन्हा प्रदूषण वाढले असून वाईट श्रेणीत गेली आहे. आता दिवाळीच्या फटाक्यांमुळे हवेतील प्रदूषण आणखी वाढून गुणवत्ता निकृष्ट श्रेणीत जाण्याची शक्यता आहे.
‘एमपीसीबी’ आणि ‘आयआयटीएम’ यांच्या यंत्रांद्वारे सध्या वाहतूक असलेले चौक, व्यापारी व औद्योगिक परिसर, तसेच निवासी भागातील हवा तपासली जाते. हा डेटा ठरावीक कालावधीनंतर अद्ययावत केला जातो. शहरात गेल्या काही दिवसांपासून हवामान स्वच्छ झाल्याने हवेतील आर्द्रता कमी झाली. त्यामुळे प्रदूषणाचे कण हवेत अधिक काळ राहत आहेत. परिणामी, शहराचा एकूण ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय) शनिवारी वेगवेगळ्या भागात वेगवेगळा नोंदविला गेला. महाल येथील हवा सर्वात प्रदूषित जाणवली. याठिकाणी शनिवारी 221 एक्यूआय, 17 ऑक्टोबरला 223 एक्यूआय, 16 ऑक्टोबरला 184 एक्यूआय होता. अंबाझरी येथील हवा शनिवारी 185 एक्यूआय, 17 ऑक्टोबरला 182 एक्यूआय, तर 16 ऑक्टोबरला 134 एक्यूआय होता. जीपीओ येथील हवा शनिवारी 189 एक्यूआय, 17 ऑक्टोबरला207 एक्यूआय, 16 ऑक्टोबरला 158 एक्यूआय होती. रामनगरातील हवा शनिवारी 178 एक्यूआय, 17 ऑक्टोबरला 200 एक्यूआय, तर 16 ऑक्टोबरला एक्यूआय 169 होता.
हवेचा गुणवत्ता निर्देशांक
एक्यूआय शेरा
0-50 चांगला
51-100 समाधानकारक
101-200 मध्यम
201-300 वाईट
301-400 अत्यंत वाईट