तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Nanddeep Foundation दसऱ्याच्या दिवशी एक निराधार वृद्ध शासकीय रुग्णालयात उपचाराधीन होते. दरम्यान, त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांचा शोध लागला नाही. ही बाब शहर पोलिसांनी नंददीप फाऊंडेशनला कळविल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीवर 16 ऑक्टोबरला हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दसरा, दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर हे निराधार वृद्ध आपल्या आजारपणाने विव्हळत होते. 2 ऑक्टोबरपासून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. ते बोलू तसेच चालू शकत नव्हते. या दरम्यान त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला आले नाही. रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांनीही त्यांच्या नातलगांचा शोध घेतला, परंतु त्यात यश आले नाही. अशातच त्या वृद्धाचा मृत्यू झाला. मागील चार दिवसांपासून त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात होता. शेवटी, शहर पोलिस अविनाश गोदमले व योगेश नागदिवे यांच्या विनंतीवरून नंददीप फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी त्या वृद्धाचा अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. संस्थेचे संचालक संदीप शिंदे यांच्यासह स्वयंसेवक निशांत सायरे, विजय कुळझरकर, गौशूल, शाहरुख, कृष्णा यांनी दफनविधी पार पाडला. यावेळी नगरपालिकेचे जब्बार उपस्थित होते.
निराधार वृद्धांची माहिती कळवावी : संदीप शिंदे
कौटुंबिक उपेक्षेतून बरेच जण निराधार होत आहे. अशा निराधारांची संख्या समाजात लक्षणीय आहे. परंतु माणुसकीच्या नात्याने अशा निराधारांना आशय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुठेही असे निराधार व्यक्ती आढळून आले तर त्यांनी समर्थवाडी नगर, नगरपालिका शाळा क्र. 19 यवतमाळ येथे संपर्क साधावा.