निर्घृण हत्या! नॉनवेज बिर्याणी ठरली जीवघेणी, पाहिजे होती वेज बिर्याणी!

19 Oct 2025 12:25:06
झारखंड,
Ranchi biryani murder case झारखंडच्या राजधानीत रांची येथे शनिवारी उशिरा रात्री एक धक्कादायक घटना घडली. कांके-पिठोरिया रस्त्यावर स्थित 'सेफ चौपाटी' या रेस्टॉरंटमध्ये फक्त बिर्याणीच्या ऑर्डरवरून निर्माण झालेल्या वादातून हॉटेलचे मालक विजय कुमार यांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
 
 

Ranchi biryani murder case  
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री चार युवक एका कारमधून रेस्टॉरंटमध्ये आले. त्यांनी वेज बिर्याणीची ऑर्डर दिली होती. मात्र, हॉटेलकडून चुकून नॉनवेज बिर्याणी सर्व्ह करण्यात आली. या चुकीवरून वाद वाढत गेला आणि त्याचे रूप हिंसक संघर्षात बदलले. वाद वाढत असतानाच युवकांपैकी एकाने आपल्या कमरेतून पिस्तूल काढून विजय कुमार यांच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले.घटनेनंतर आरोपी युवक कारमध्ये बसून पिठोरिया मार्गावरून पसार झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने विजय कुमार यांना रिम्स (RIMS) रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गुन्ह्याची माहिती मिळताच रांची ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रवीण पुष्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली. कांके पोलीस ठाण्याच्या पथकासोबत मिळून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. पोलिसांनी लगेचच तपासाची चक्रे फिरवली असून, रांची शहराच्या प्रवेश व निर्गमन बिंदूंवर सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. रेस्टॉरंटमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींच्या ओळखीचा प्रयत्न केला जात आहे.पोलीस या हत्याकांडामागील सर्व शक्य कोन तपासत आहेत. प्राथमिक तपासानुसार ही घटना वेज व नॉनवेज बिर्याणीच्या गैरसमजावरून झाल्याचे दिसते. मात्र, पोलिसांना हेही तपासायचे आहे की, यामागे कुठली पूर्ववैमनस्यता अथवा योजनाबद्ध कटकारस्थान तर नव्हते ना.
 
 
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रांची शहरात वाढत चाललेला गुन्हेगारीचा प्रवाह आणि किरकोळ कारणांवरून होणारी जीवघेणी हिंसा ही प्रशासनासाठी एक गंभीर आव्हान बनली आहे.हॉटेल व्यवसायिक विजय कुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून, या हत्येने समाजातील असहिष्णुतेचे आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाचे चिंताजनक चित्र समोर आणले आहे.
Powered By Sangraha 9.0