‘ताडोबा’त पहिल्यांदाच ‘युरोपियन नीलपंख’!

19 Oct 2025 19:52:43
चंद्रपूर, 
 
Tadoba-european roller ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रातील जैवविविधतेत मोलाची व ऐतिहासिक भर पडली असून, 1 ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे गस्तीवर असताना वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच वन्यजीव अभ्यासक रुंदन कातकर यांना कोळसा कुरण भागात ‘युरोपियन रोलर’ अर्थात, युरोपीयन नीलपंख हा स्थलांतरित आणि आकर्षक निळ्या रंगाचा पक्षी आढळला. या पक्ष्याचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातप्रथमच दर्शन झाल्याची ही नोंद अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
 
 
 
 
tadoba-european-roller
 
 
 
Tadoba-european roller युरोपियन रोलर हा पक्षी मुख्यत्वे युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेच्या काही भागात आढळतो. भारतात तो फार मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करीत नाही, मात्र अल्पकाळासाठी काही निवडक ठिकाणी त्याची नोंद झाली आहे. ताडोबात झालेली ही पहिली नोंद पर्यावरण संवर्धन आणि पक्षीनिरीक्षकांसाठी अत्यंत आनंददायी आणि गौरवास्पद घटना आहे. हा पक्षी साधारण 29 ते 32 सें. मी. लांबीचा असून, त्याचा रंग आकर्षक निळा व पंखांवर तपकिरी झाक असलेला असतो. तो मुख्यत्वे मोठे कीटक, सरडे आणि लहान प्राणी पकडतो. त्याचे स्थलांतर पावसाळ्यानंतर आणि हिवाळ्याच्या काळात होते. ताडोबा जंगलातील समृद्ध अधिवास आणि विविध परिसंस्था अशा स्थलांतरित पक्ष्यांना थांबण्यासाठी आदर्श वातावरण उपलब्ध करून देतात.
 
हवामान बदलाचे संकेत देणारा पाहुणा : सुरेश चोपणे
Tadoba-european roller रूंदन काटकर यांनी युरोपियन रोलर या दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्याचे छायाचित्र टिपलेआहे. हा आकर्षक पक्षी आपल्या तेजस्वी रंगांमुळे सहज ओळखता येतो. युरोपियन रोलरचा पुढील भाग निळ्या रंगाचा, तर मागचा भाग भुरकट रंगाचा असतो. याउलट भारतात आढळणारा इंडियन रोलर (नीलपंख) या पक्ष्याचा पुढील भाग भुरकट व पाठीमागचा भाग निळा रंगाचा असतो. या दोन्ही पक्ष्यांचे अधिवास (हॅबिटॅट) साधारण सारखे असल्याने, योग्य हवामान आणि आहार मिळाल्यास युरोपियन रोलर भारतात स्थलांतर करतो. अशा पक्ष्यांचे आगमन हे केवळ जैवविविधतेचे द्योतक नसून, हवामानातील सूक्ष्म बदलांचेही संकेत आहे. या दुर्मीळ पक्ष्याचे पुढील निरीक्षण आणि नोंदणी करण्याचे काम पक्षीप्रेमींच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणप्रेमी सुरेश चोपणे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0