तभा वृत्तसेवा दारव्हा,
Ankush Ramgade भारत हा देश विविधतेने नटलेला आहे. अनेक राज्य व तेथील प्रांतीय भाषेने सजलेला हा जगातला एकमेव देश आहे. ज्या ठिकाणी पूजा पद्धती वेगळी, वेशभूषा, बोलीभाषा वेगळी, वातावरण, ऋतू वेगळे असले तरी आमच्यात एकत्वाची भावना आहे. आई व गायीवरची आस्था सर्वदूर समान आहे. त्या सगळ्यांना पूजनीय आहेत आणि हीच आमची ओळख आहे, असे प्रतिपादन अंकुश रामगडे यांनी केले.
दारव्हा तालुक्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भुलाई मंडळाचा विजयादशमी उत्सव ईरथळ येथील समाज मंदिर प्रांगणात पार पडला. या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून विभाग कार्यवाह अंकुश रामगडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ईरथळचे सामाजिक कार्यकर्ते व श्री भैरवनाथ संस्थानचे सदस्य प्रवीण हिरवे आणि तालुका खंड कार्यवाह श्याम जाधव उपस्थित होते.
रामगडे पुढे म्हणाले, संघाचे काम समाजात राहून समाज परिवर्तन करण्याचे काम संघ स्वयंसेवक करतात. जाती, धर्म वेगवेगळे असले किंवा पूजापद्धती वेगळी असली तरी संघाच्या दृष्टीने ते सर्व समान आहेत. जो या देशाला आपला मानतो तोच या देशाचा खरा नागरिक आहे. संघ शताब्दी वर्षामध्ये पंच परिवर्तनच्या माध्यमातून समाज परिवर्तन करणार आहे.अतिथी प्रवीण हिरवे यावेळी म्हणाले, संघ देशाच्या कानाकोपèयात पोहोचला असून सेवेचे कार्य सर्वदूर चालते. देशावर येणारे परकीय संकट असो, वा नैसर्गिक आपत्ती असो, संघ नेहमी अग्रेसर राहिला आहे. संघाच्या स्वयंसेवक कधी आदेशाची वाट पाहत नाही. तो स्वयंप्रेरणेने आपला समाज बंधू, आपला देशबंधू या नात्याने संकटकाळी धावून जातो. त्याचे अनेक उदाहरणे या शंभर वर्षांत आपण पाहिली आहेत. आपल्या परिवारातील एक सदस्य तरी संघाच्या शाखेत रोज गेलाच पाहिजे.
सुरवातीला स्वयंसेवकांनी नियुद्ध, सूर्यनमस्कार, समता, सामूहिक व्यायामयोगाचे प्रात्यक्षिक केले. प्रास्ताविक, परिचय व आभार मंडल कार्यवाह गणेश राठोड यांनी केले. वैयक्तिक गीत उपखंड कार्यवाह मोहन आडे यांनी गायले. सुभाषित सतीश राठोड, तर अमृतवचन सागर हिरवे व सांघिक गीत कृष्णा खडसे यांनी म्हटले. उत्सवाच्या आधी संपूर्ण गणवेशात घोषासह पथसंचलन निघाले. ठिकठिकाणी पथसंचलनातील स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली. मार्गावर सडा रांगोळ्या काढून स्वागत केले. या उत्सवासाठी सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.