वर्धा,
Brown Butik in Wardha सेवाग्राम येथे १८ रोजी सकाळी मोकळ्या झुडुपाळलेल्या प्रदेशात पक्षी प्रजातींच्या रंजक जगात तपकिरी खाटिक या नव्या निरीक्षणाची भर पडली. तपकिरी खाटिक यालाच इंग्रजीमधे ब्राउन श्राईक तर याचे शास्त्रीय नाव लॅनियस क्रिस्टॅटस असे आहे. हा पक्षी वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला. पक्षी निराक्षणाकरिता गेलेल्या प्रतिक पाल व राहुल वकारे यांनी पक्ष्याचे छायाचित्र आणि त्याचा कॉल रेकॉर्ड करून नोंद घेतली.
उत्तर आशियाचा दुर्मिळ पाहुणा तसेच मध्यम आकाराचा खाटिक पक्षी, तपकिरी खटिक हा हिवाळी स्थलांतर करणारा पक्षी असून त्याचा प्रवास सायबेरिया, मंगोलिया, चीन आणि जपानहून भारताकडे होतो. साधारण १७ ते २० सेंटीमीटर लांब असलेला या सुंदर पक्ष्याची तपकिरी पाठ व डोके, धवल रंगाची खालची बाजू आणि काळ्या डोळाच्या पट्टीमुळे हा सहज ओळखता येतो. हा मध्यम पण धाडसी शिकारी पक्षी ’खाटिक’ सदृष्श्य वर्तनासाठी प्रसिद्ध आहे. तो आपल्या शिकार केलेल्या अळ्या, लहान बेडके किंवा सरडे यांना झाड्याच्या काटे किंवा तारांवर बोचून ठेवतो आणि नंतर खातो. ही अनोखी पद्धत त्याला इतर पक्ष्यांपेक्षा वेगळे ठरवते आणि त्याच्या हुशारीचा सुद्धा परिचय देते.
या दुर्लभ नोंदीचा पक्ष्याच्या फोटोंसह जागतिक पक्ष्यांचा महितीसाठा असणार्या ई-बर्ड च्या संकेतस्थळावर नोंद केली गेली असून वर्धा जिल्ह्यातील हि पहिली अधिकृत नोंद म्हणून नोंदवली गेली आहे. या नोंदीमुळे स्थलांतर दरम्यान वर्धा जिल्ह्यातील अनुकूल पर्यावरणीय परिस्थितीची प्रचीती येते.