वर्धा,
Burglary case solved समुद्रपूर तालुयातील उसेगाव येथे घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरट्या महिलेकडून २ लाखांचा ऐवज जप्त केला. पार्वता श्रीरामे (५०) रा. उसेगाव या शेतमजुरीच्या कामाला गेल्या होत्या. दरम्यान, अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. लोखंडी पेटी उघडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले होते. तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गिरड येथील गुन्ह्याचा तपास करीत होते. माहितीच्या आधारे गुन्ह्यातील महिला आरोपीस विश्वासात घेऊन चोरी गेलेल्या सोन्याच्या दागिन्याबाबत विचारपूस केली. तेव्हा तिने चोरी केल्याची कबुली दिली. तिच्या ताब्यातून सोन्याचा गोफ, टॉप्स एक जोड, एक जोड सोन्याची डोरले, सोन्याची नथ, चांदीचे जोडवे असा २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, मनोज धात्रक, महादेव सानप, पवन पन्नासे, विनोद कापसे, पल्लवी बोबडे यांनी केली.