मुंबई,
Chance of rain in the state सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा पावसाच्या सरींसाठी सज्ज होत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या वर्षीच्या दिवाळीदरम्यान राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबई महानगर प्रदेशसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये हवामानात अचानक बदल होण्याची चिन्हे आहेत. सध्या मुंबई आणि आसपासच्या भागात प्रखर सूर्यप्रकाश आणि ऑक्टोबर हीट"मुळे उकाडा जाणवत आहे. मात्र हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, सोमवार ते बुधवार दरम्यान मुंबई आणि उपनगरांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. अरबी समुद्रात तयार होणारे कमी दाबाचे क्षेत्र किनारी भागातील हवामान बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. ही प्रणाली पश्चिम वायव्य दिशेने सरकत असताना अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण अंदमान समुद्रावर तयार झालेल्या चक्रीय परिभ्रमणामुळे मंगळवारपर्यंत आग्नेय बंगालच्या उपसागरात नवीन दाब क्षेत्र निर्माण होऊ शकते.
या हवामान बदलामुळे केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, तर महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस वादळ, विजा आणि गडगडाटीसह पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पिवळा इशारा (Yellow Alert) जारी केला आहे. 18 ते 22 ऑक्टोबरदरम्यान कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी सरी पडण्याची शक्यता असून, 21 व 22 ऑक्टोबर रोजी मराठवाडा आणि विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये रविवारी विजांसह पाऊस, तर रत्नागिरी, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये विखुरलेला हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. मराठवाड्यात आकाश बहुतेक वेळा ढगाळ राहील, दिवसाचे तापमान थोडे कमी आणि रात्री किंचित उष्ण राहील. एकंदरीत, या वर्षीची दिवाळी रिमझिम पावसात ओलसर वातावरणात साजरी होणार असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.