Video इतिहासातील सर्वात मोठे 'नो किंग्स' आंदोलन

20 Oct 2025 10:11:17
वॉशिंग्टन
No Kings protest, अमेरिकेतील राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात रविवारी एक ऐतिहासिक जनआंदोलन झाले. देशभरातील २६०० हून अधिक ठिकाणी होऊन हे आंदोलन गेल्या काही महिन्यांतील सर्वात मोठं ठरलं आहे. या रॅलींमध्ये सुमारे ७० लाख लोकांनी सहभागी होऊन ट्रम्प प्रशासनाच्या हुकुमशाही धोरणांवर जोरदार निषेध केला. या आंदोलनाला "नो किंग्स प्रोटेस्ट" असे नाव देण्यात आले आहे.
 
 
rt
 
न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर, बोस्टन, अटलांटा, शिकागो आणि वॉशिंग्टनसह लॉस एंजेलिस आणि रिपब्लिकन शासित राज्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर रॅलीज पार पडल्या. रिपब्लिकन पक्षाने या निदर्शनांना "हेट अमेरिका रॅलीज" असे नाव दिले असतानाच, ट्रम्प यांनीही या निषेधांवर एआय जनरेटेड व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटरवर २० सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला ज्यात त्यांना मुकुट घातलेल्या लढाऊ विमानाच्या पायलटच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे, ज्यावर "किंग ट्रम्प" लिहिले आहे. या व्हिडिओमध्ये ट्रम्प निदर्शकांवर विष्ठा फेकताना दिसत आहेत.
ट्रम्प यांच्या कार्यकाळातील हे तिसरे मोठे आंदोलन असून, जून महिन्यातही "नो किंग्स" आंदोलन २१०० ठिकाणी झालं होतं. त्यावेळी हिंसाचार आणि एका मृत्यूची घटना देखील झाली होती. तसेच, जुलै महिन्यात स्थलांतरितांच्या हद्दपारी, गरिबांसाठी आरोग्य सुविधांमध्ये कपात यासारख्या धोरणांवर हजारो ठिकाणी निदर्शने झाली होती.
 
 
सध्या अमेरिकेतील शटडाउनमुळे सरकारी सेवा ठप्प आहेत आणि ट्रम्प प्रशासन व संसद यांच्यात तणाव वाढला आहे. आंदोलनकर्त्यांनी लोकशाही, न्याय आणि सत्तेच्या गैरवापराविरुद्ध शांततेत आवाज उठवला. ह्युस्टनमधील माजी युएस मरीन कॉर्प्स सैनिक डॅनियल गेमेझ म्हणाले, "या देशात सध्या काय चाललंय ते मला समजत नाही."आंदोलन शांततेत पार पडले असून कोणतीही अटक झालेली नाही. न्यूयॉर्क शहरात १ लाखाहून अधिक नागरिकांनी सहभागी होऊन विरोध नोंदवला आहे. ट्रम्प प्रशासनाच्या कठोर धोरणांमुळे देशभरात तणाव वाढत असून, या आंदोलने याच तणावाची साक्ष देत आहेत.
Powered By Sangraha 9.0