मानोरा,
Soybean purchasing center सततचा पाऊस आणि ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीमुळे यंदा सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच बाजारात सोयाबीनला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने तात्काळ हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की तालुयातील शेतकर्यांचे यावर्षीचे उत्पादन कमी आले असून, रब्बी हंगामासाठी बियाणे खरेदीसाठी निधीची कमतरता भासत आहे.

शासनाकडून मदत मिळाली नसल्याने अनेक शेतकर्यांनी आपला सोयाबीन माल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केला आहे. त्यामुळे ज्या शेतकर्यांनी बाजार समितीत सोयाबीन विकला आहे, अशा सर्व शेतकर्यांना २ हजार रुपये प्रति क्विंटल परतावा (अनुदान) देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या बाजारात सोयाबीनला केवळ ३,५०० ते ४ हजार रुपये इतकाच दर मिळत असून, शासनाने जाहीर केलेला हमीभाव ५,३२८ इतका आहे. जिल्ह्यात आणि तालुयात अद्याप हमीभावाने खरेदी सुरू झालेली नाही, त्यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. हमीभावाने खरेदी सुरू करावी, तसेच ज्यांनी आधीच बाजार समितीत सोयाबीन विकला आहे त्यांना दरातील फरकाची रक्कम शासनाकडून अदा करावी, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. असे न झाल्यास शेतकर्यांच्या वतीने काँग्रेस पक्ष आंदोलनाचा मार्ग अवलंबेल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर मानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमोल तरोडकर, ओबीसी प्रदेश काँग्रेस नेते गजानन राठोड, शहराध्यक्ष हाफिज खान, पदाधिकारी रामनाथ राठोड, डॉ. निरंजन खुपसे, वसंतराव भगत, गोपाल चीस्तळकर, निलेश भोरकडे, बरखा बेग, अल्ताब बेग आदींच्या स्वाक्षर्या आहेत.