नवी दिल्ली,
Warning for fishermen बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे भारतीय हवामान विभागाने अंदमान आणि निकोबार बेटांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबरपासून हा चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे आणि २३ ऑक्टोबरपर्यंत या प्रदेशात मुसळधार पावसाची परिस्थिती राहू शकते. यामुळे स्थानिक बंदरांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले गेले आहे.
आयएमडीने सांगितले की, निकोबार बेटांवर ७ ते ११ सेमी दरम्यान पावसाची शक्यता आहे. २१, २२ आणि २३ ऑक्टोबर दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटांवर ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून गडगडाटासह जोरदार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तसेच २२ ते २३ ऑक्टोबर दरम्यान अंदमान समुद्रावर ३५-४५ किमी प्रतितास वेगाने आणि ५५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवस समुद्रातील परिस्थिती खवळलेली राहील.
मच्छिमारांना २४ ऑक्टोबरपर्यंत अंदमान समुद्रात तसेच अंदमान आणि निकोबार किनाऱ्याजवळ आणि बाहेर जाण्याचे टाळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचबरोबर, दिवाळीच्या दिवशी तामिळनाडूमध्येही १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २१ ऑक्टोबरच्या सुमारास आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे इरोड, निलगिरी, कोईम्बतूर, तिरुपूर, दिंडीगुल, थेनी, मदुराई, रामनगर आणि इतर अनेक भागांमध्ये ६४.५ ते १११.५ मिमी पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच शिवगंगा, पुदुकोट्टई, तंजावर, तिरुवरूर, कराईकल, मायिलादुथुराई, विल्लुपुरम, कांचीपुरम, चेंगलपट्टू, कुड्डालोर आणि नागापट्टिनम भागांमध्येही जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीने स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, कारण चक्रीवादळामुळे समुद्रात आणि किनाऱ्याजवळ स्थिती गंभीर राहण्याची शक्यता आहे.